• Sat. Aug 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ताम्हिणी घाटमार्ग ठरतोय ‘गुन्हेगारीचा हॉटस्पॉट’; सहा महिन्यांत दोन हत्यांमुळे नागरिक भयभीत

ByEditor

Aug 29, 2026

निसर्गरम्य घाटातील प्रवास बनला चिंताजनक; कोंडेथर येथील पोलिस चेकपोस्ट पुन्हा सुरू करण्याची मागणी

माणगाव । सलीम शेख
रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या अत्यंत निसर्गरम्य आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या ताम्हहिणी घाटात गेल्या काही महिन्यांपासून गंभीर गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अवघ्या सहा महिन्यांत या परिसरात दोन हत्यांच्या घटना उघडकीस आल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे ‘निसर्गरम्य ताम्हहिणी घाट की गुन्हेगारीचा हॉटस्पॉट?’ असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

जानेवारी महिन्यात एका २५ वर्षीय तरुणाची हत्या झाल्यानंतर, ऑगस्ट महिन्यात एका ३० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. माणगाव-पुणे हा घाटमार्ग कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. शिक्षण, व्यापार, रोजगार आणि पर्यटनासाठी दररोज शेकडो नागरिक, महिला, विद्यार्थी व पर्यटक या मार्गाने प्रवास करतात. विशेषतः पावसाळ्यात येथील धबधबे आणि हिरवाई पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र, सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे या मार्गावर भीतीचे सावट पसरले आहे.

रात्रीच्या वेळी शुकशुकाट अन् नेटवर्कची अडचण

दिवसा वर्दळ असलेल्या या घाटात रात्रीच्या वेळी मात्र कमालीचा शुकशुकाट असतो. घनदाट जंगल, अंधार, निर्जन परिसर आणि मोबाईल नेटवर्कच्या मर्यादांमुळे एखादी अनुचित घटना घडल्यास तातडीने मदत मिळणे कठीण होऊन बसते. या परिस्थितीचा गैरफायदा गुन्हेगार घेत असल्याचे चित्र आहे. निर्जन भागात पोलिसांची उपस्थिती कमी असल्याने विशेषतः महिला प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

कोंडेथर चेकपोस्ट पुन्हा सुरू करण्याची मागणी

पूर्वी रायगड आणि पुणे जिल्ह्यांच्या हद्दीवर कोंडेथर गावाजवळ पोलिसांचे चेकपोस्ट कार्यरत होते. मात्र, सध्या हे चेकपोस्ट बंद असल्याने संशयित वाहनांची तपासणी आणि देखरेख पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि संशयितांवर वचक ठेवण्यासाठी कोंडेथर येथील चेकपोस्ट तातडीने सुरू करावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

अपघात अन् सुरक्षेसाठी संयुक्त गस्तीची गरज

ताम्हिणी घाट हा केवळ गुन्हेगारीच्या दृष्टीनेच नव्हे, तर तीव्र वळणे, धुकं आणि निसरड्या रस्त्यांमुळे अपघातांच्या दृष्टीनेही अत्यंत संवेदनशील आहे. आपत्कालीन परिस्थितीत जखमींना तातडीने मदत मिळण्यासाठी तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी रायगड आणि पुणे पोलिसांनी संयुक्तपणे विशेष गस्त पथक तैनात करावे, संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि आपत्कालीन मदत केंद्रे उभारावीत, अशी मागणी नागरिकांकडून प्रशासनाकडे केली जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!