पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शिक्षणासह महिला-बालकांच्या सुविधांना प्राधान्य
श्रीवर्धन । अनिकेत मोहित
श्रीवर्धन शहरातील विविध नागरी सुविधांना बळकटी देण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांना आता गती मिळत असून शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी महिला व बालविकास मंत्री ना. कु. अदितीताई सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण तसेच नवीन कामांचे भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था, रस्ते, स्वच्छता, शिक्षण तसेच महिला व बालकांसाठीच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने ही कामे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
आराठी येथील विद्यमान जीर्ण जलसाठा टाकी अर्थात जीएसआरची दुरुस्ती, पंपगृहाचे बांधकाम, जुन्या जलवाहिनीची दुरुस्ती व सुधारणा तसेच पंपिंग यंत्रसामग्री बसविण्याच्या कामाचे यावेळी लोकार्पण करण्यात आले. शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या कामामुळे पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर श्री. बाळकृष्ण गोरनाक यांच्या घरापासून श्री. भगत सर यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचेही लोकार्पण करण्यात आले.
शहरातील इतर नागरी सुविधांच्या विकासालाही यावेळी प्राधान्य देण्यात आले. भटक्या श्वानांसाठी निवारा शेड उभारणे, सर्व सुविधांनी युक्त स्वयंचलित शौचालय खरेदी करून बसविणे तसेच मोहल्ला येथील मदरशाजवळील पऱ्यावर स्लॅब टाकण्याच्या कामाचाही यामध्ये समावेश आहे. या सुविधांमुळे शहरातील स्वच्छता आणि नागरिकांच्या दैनंदिन सोयी-सुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
श्रीवर्धन नगरपरिषद शाळा क्रमांक ७ च्या पहिल्या मजल्याच्या बांधकामाचे भूमिपूजनही अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या नवीन बांधकामामुळे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा आणि उपलब्ध जागेत वाढ होणार असून नगरपरिषद शाळेच्या पायाभूत सुविधांना अधिक बळकटी मिळणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत ३ टक्के निधीतून श्रीवर्धन बस स्थानकात उभारण्यात आलेल्या ‘हिरकणी कक्षा’चेही यावेळी लोकार्पण करण्यात आले. प्रवासादरम्यान महिला आणि लहान बालकांना सुरक्षित, सुसज्ज व स्नेहपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा कक्ष उभारण्यात आला असून महिला प्रवाशांसाठी ही सुविधा निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.
या कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष, सभापती, नगरसेवक, शहराध्यक्ष, विविध पक्षांचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरपरिषद प्रशासनाच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
श्रीवर्धन शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन मूलभूत नागरी सुविधांचा दर्जा सुधारण्याबरोबरच शहराच्या पायाभूत विकासाला चालना देण्यासाठी नगरपरिषदेमार्फत विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, स्वच्छता आणि महिला-बालकांसाठीच्या सुविधांशी संबंधित कामे प्रत्यक्षात येत असल्याने श्रीवर्धनच्या विकासाला आगामी काळात आणखी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीवर्धन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि संबंधितांनी विशेष परिश्रम घेतले.
