• Wed. Jul 15th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पेणकरांचे अलिबागचे फेरे वाचणार; पेणमध्येच सुरू होणार वीज मीटर टेस्टिंग सुविधा!

ByEditor

Jul 15, 2026

नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; महावितरणकडून याच महिन्यात सुविधा सुरू करण्याचे आश्वासन

विनायक पाटील
पेण :
वीज बिल जास्त आल्यास किंवा मीटरमध्ये बिघाड असल्यास मीटर टेस्टिंगसाठी पेणकरांना आता अलिबागच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. पेण नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रवीण शंकर पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पेण येथेच महावितरण कार्यालयात मीटर टेस्टिंग सुविधा सुरू होणार आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याच महिन्याच्या आत ही सुविधा उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.

या संदर्भात नगरसेवक प्रवीण पाटील यांनी १४ जुलै २०२६ रोजी महावितरण महामंडळाला अधिकृत पत्र पाठवून पेणकरांची कैफियत मांडली होती. “वीज बिल जास्त आल्यास मीटर तपासणीसाठी पेणमधील ग्राहकांना अलिबाग कार्यालयात जावे लागते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जातात. हा त्रास थांबवण्यासाठी स्थानिक पातळीवरच मीटर टेस्टिंगची व्यवस्था करावी,” अशी आग्रही मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली होती.

नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या या मागणीची महावितरण प्रशासनाने तात्काळ दखल घेतली असून, पेण कार्यालयातच ही सुविधा याच महिन्यात कार्यान्वित केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. महावितरणच्या या निर्णयामुळे पेण शहर आणि परिसरातील हजारो वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार असून, नागरिकांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!