• Wed. Jul 15th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

किल्ले रायगड परिसरातील हॉटेल, लॉजिंगवर पोलिसांची करडी नजर; १५ दिवसांत सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश

ByEditor

Jul 15, 2026

नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई; महाड पोलीस निरीक्षकांचा इशारा

सलीम शेख
माणगाव :
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडाची सुरक्षितता, कायदा-सुव्यवस्था आणि पर्यटकांचा विश्वास अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस प्रशासनाने पावले उचलली आहेत. पाचाड येथे रायगड परिसरातील सर्व हॉटेल व लॉजिंग व्यावसायिकांची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. महाड पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक अभिजित नवसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत व्यावसायिक नियमांचे कडक पालन करण्याचे निर्देश देण्यात आले असून, नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

या बैठकीला रायगड व्यावसायिक संघटनेचे सुमारे ४० हॉटेल व लॉजिंग व्यावसायिक उपस्थित होते.

१५ दिवसांत सीसीटीव्ही बंधनकारक

बैठकीत पोलीस निरीक्षक अभिजित नवसे यांनी व्यावसायिकांना स्पष्ट शब्दांत सुनावले की, “रायगड हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे आणि इतिहासाचे प्रतीक आहे. येथे कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर किंवा संशयास्पद हालचालींना थारा दिला जाणार नाही.”

या पार्श्वभूमीवर पुढील निर्णय व नियम लागू करण्यात आले आहेत:

  • सीसीटीव्ही सक्ती: प्रत्येक हॉटेल व लॉजमध्ये येत्या १५ दिवसांत उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक आहे. विशेषतः प्रवेशद्वार, रिसेप्शन आणि पार्किंग क्षेत्रावर नजर असणे आवश्यक आहे.
  • कागदपत्रांची पडताळणी: प्रत्येक पाहुण्याची संपूर्ण माहिती रजिस्टरमध्ये नोंदवणे आणि वैध ओळखपत्र (आयडी प्रूफ) घेतल्याशिवाय कोणालाही रूम न देणे सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच ही माहिती शक्यतो डिजिटल स्वरूपात जतन करावी.
  • अल्पवयीनांना प्रवेश नाही: १८ वर्षांखालील व्यक्तींना तसेच आवश्यक कायदेशीर अटी पूर्ण न करणाऱ्यांना रूम दिली जाऊ नये.
  • परवाने अद्ययावत ठेवा: अन्न सुरक्षा परवान्यासह (FSSAI) शासनाचे इतर सर्व वैध परवाने अद्ययावत असणे गरजेचे आहे. तपासणीत त्रुटी आढळल्यास थेट कारवाई होईल.

गुन्हेगारी कृत्य आढळल्यास थेट कारवाई!

“हॉटेल किंवा लॉजचा वापर देहविक्री, अमली पदार्थांची तस्करी किंवा इतर कोणत्याही गुन्हेगारी कृत्यासाठी होत असल्याचे आढळल्यास केवळ मॅनेजरच नाही, तर संबंधित मालकावरही थेट कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा कडक इशारा पोलीस निरीक्षक नवसे यांनी दिला आहे. तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

संघटनेचे सहकार्याचे आवाहन

बैठकीच्या शेवटी रायगड व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष रघुवीर देशमुख आणि सचिव तानाजी महादेव औकीरकर यांनी सर्व हॉटेलचालकांना प्रशासकीय नियमांचे प्रामाणिकपणे पालन करण्याचे आवाहन केले. रायगडची सुरक्षित, स्वच्छ आणि आदर्श पर्यटनस्थळ म्हणून असलेली ओळख अधिक दृढ करण्यासाठी पोलिसांना पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासनही संघटनेच्या वतीने देण्यात आले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!