विनापरवाना व्यवसायांवर कायदेशीर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी
श्रीवर्धन । अनिकेत मोहित
श्रीवर्धन तालुक्यातील आराठी ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या भंगार खरेदी-विक्री व्यवसायाच्या वैधतेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी संबंधित व्यावसायिकांना ग्रामपंचायतीने दोन वेळा कायदेशीर नोटीस बजावूनही त्यांनी अद्याप आवश्यक कागदपत्रे सादर केलेली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नोटिसांना केराची टोपली दाखवणाऱ्या या व्यावसायिकांवर आता तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून लावून धरली जात आहे.
नोटिशीमध्ये मागितला परवानग्यांचा हिशोब
आराठी ग्रामपंचायतीने संबंधित भंगार व्यावसायिकांना व्यवसायाच्या वैधतेसंदर्भातील सर्व अधिकृत कागदपत्रे तातडीने ग्रामपंचायत कार्यालयात सादर करण्याचे आदेश दिले होते. या नोटीसमध्ये व्यवसाय सुरू असलेल्या जागेच्या मूळ मालकाचे संमतीपत्र (NOC) आणि ७/१२ उतारा, ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला व असेसमेंट उतारा, संबंधित शासकीय विभागांकडून मिळालेले अधिकृत परवाने, संबंधित व्यावसायिकाचे ओळखपत्र, रेशनकार्ड आणि कायमस्वरूपी रहिवासी असल्याचा पुरावा या कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे:
“ग्रामपंचायत हद्दीत कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या आणि प्रशासकीय नोंदी असणे बंधनकारक आहे. संबंधित व्यवसायाची संपूर्ण माहिती ग्रामपंचायतीकडे उपलब्ध असणे आवश्यक असल्यानेच ही कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाचे म्हणणे आहे.
व्यावसायिक पाठीशी कुणाचा वरदहस्त?
सलग दोन नोटिसा बजावूनही संबंधित व्यावसायिकांनी कागदपत्रे सादर का केली नाहीत? प्रशासनाच्या आदेशांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यामागचे नेमके कारण काय? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. हा व्यवसाय सर्व आवश्यक शासकीय परवानग्यांसह सुरू आहे की यामागे काही बेकायदेशीर प्रकार आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता नागरिकांनी केली आहे.
विनापरवाना व्यवसायांची तपासणी करण्याची मागणी
या प्रकरणात नियमांचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. तसेच, आराठी ग्रामपंचायत हद्दीत इतरही अनेक विनापरवाना व्यवसाय सुरू असल्याची शक्यता असून, प्रशासनाने त्यांचीही तपासणी करून तात्काळ मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या प्रकरणामुळे तालुक्यातील भंगार व्यवसायांच्या वैधतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आता स्थानिक प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण श्रीवर्धनवासीयांचे लक्ष लागले आहे.
