• Fri. Jul 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये रामरक्षा आंदोलनाला उस्फूर्त प्रतिसाद

ByEditor

Jul 17, 2026

उरण । घन:श्याम कडू
अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येतील मंदिरात कथित सोने, चांदी आणि कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या ‘रामरक्षा आंदोलन’च्या हाकेला उरणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुरुवारी श्रीराम मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाआरतीने संपूर्ण परिसर ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दणाणून गेला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उरण तालुका व शहर शाखेच्या वतीने जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात श्रीराम रक्षास्तोत्र पठणाने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीरामाची महाआरती करण्यात आली. यावेळी मंदिर परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर आणि उरणच्या नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना अयोध्येतील श्रीराम मंदिराशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहाराची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली. केवळ कनिष्ठ स्तरावरील व्यक्तींवर कारवाई करून जबाबदारी संपत नाही. या प्रकरणातील सर्व जबाबदारांवर कायद्याप्रमाणे कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

वक्त्यांनी सांगितले की, श्रीराम हे देशाच्या श्रद्धेचे केंद्र आहेत. त्यामुळे श्रीराम मंदिराशी संबंधित कोणत्याही कथित गैरव्यवहाराची वस्तुस्थिती जनतेसमोर यावी आणि दोषींना कोणत्याही प्रकारचे संरक्षण मिळू नये. राज्यभर सुरू असलेल्या रामरक्षा आंदोलनाच्या माध्यमातून ही मागणी अधिक तीव्र केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या शेवटी तालुका संघटक बी. एन. डाकी यांनी उपस्थितांचे आभार मानले. ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला.

या महाआरतीस माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, शहर संघटक दिलीप रहाळकर, जिल्हा परिषद सदस्या प्रेरणा पाटील, पंचायत समिती सदस्या कविता पाटील, नगरसेवक गटनेते अतुल ठाकूर, तसेच शिवसेनेचे विविध पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेना कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, बूथप्रमुख, ज्येष्ठ कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक व श्रीरामभक्त उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!