उरण । घनःश्याम कडू/विठ्ठल ममताबादे
नागाव ग्रामपंचायतीच्या २०२० ते २०२५ या कालावधीतील कारभारात तब्बल १३ ते १५ कोटी रुपयांचा कथित भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप नागाव ग्रामपंचायत संघर्ष समितीने केला असून, या आरोपांमुळे उरण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद व कोकण विभागीय आयुक्तांकडे झालेल्या चौकशीत आर्थिक अनियमितता उघडकीस येऊनही तत्कालीन सरपंच चेतन गायकवाड व ग्रामविकास अधिकारी किरण केणी यांच्यावर अद्याप गुन्हे दाखल का झाले नाहीत, असा संतप्त सवाल संघर्ष समितीने उपस्थित केला आहे. केवळ पैसे वसूल करून हे प्रकरण गुंडाळण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत याविरोधात येत्या २ सप्टेंबर रोजी माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली उरण पंचायत समितीवर धडक मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे.
म्हातवली येथील माऊली रिसॉर्टमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत संघर्ष समितीने नागाव ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांचा अक्षरशः पंचनामा केला. तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा परिषदेकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली. त्यानंतर ९ फेब्रुवारी २०२६ रोजी चौकशी अहवाल कोकण विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आणि १८ मे २०२६ रोजी संबंधितांकडून अनियमित रक्कम वसूल करण्याचे तसेच पुढील योग्य कारवाईचे आदेश देण्यात आले. मात्र, “जनतेच्या पैशांची लूट झालेली असताना केवळ वसुली केली म्हणजे पाप धुतले गेले का?” असा सवाल विचारत दोषींवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची आक्रमक मागणी संघर्ष समितीने लावून धरली आहे.
पत्रकार परिषदेत ग्रामपंचायतीच्या विविध खर्चांवर गंभीर संशय व्यक्त करण्यात आला. यात महानगर गॅस पाइपलाइनच्या ₹१८.९५ लाख नुकसानभरपाईचा वापर, सोलर पथदिव्यांवरील ₹१९.४९ लाखांचा खर्च, नालेसफाई, साहित्य खरेदी, पाणीपुरवठ्यावरील ₹५६.३५ लाख, ONGC Water ATM, कर्मचारी वेतन, डेड स्टॉक आणि घंटागाडीच्या डिझेल खर्चातील अनियिमततेचा समावेश आहे. याशिवाय, ONGC कडील कोट्यवधी रुपयांच्या कर थकबाकीबाबत ग्रामस्थांना किंवा ग्रामसभेला विश्वासात न घेता केवळ ४० टक्के रक्कम स्वीकारून तडजोड करण्यात आल्याचा आरोपही समितीने केला. या कर तडजोडीसाठी ₹१६ लाख वकिलांची फी, २०२० ते २०२५ दरम्यान कायदेशीर सल्ला आणि कोर्ट कामासाठी ₹२४.५० लाख, तसेच कार्यालयीन जागेच्या वादासाठी ₹२५ लाख फी निश्चित करून ₹७ लाख आगाऊ दिल्याचे संशयास्पद व्यवहार उघडकीस आले आहेत.
या सर्व गैरव्यवहारात गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील आणि ग्रामविस्तार अधिकारी विनोद मिंडे यांनी दुर्लक्ष करून दोषींची पाठराखण केल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे. तसेच बांधकाम व पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांची भूमिका तपासून दोषी आढळल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. उरण पंचायत समितीचे सभापती शेकापचे असूनही नागाव गावाला न्याय मिळत नसल्याबद्दल उपस्थितांनी खंत व्यक्त केली. या पत्रकार परिषदेस स्वप्नील माळी, कल्पेश सुतार, काका पाटील, जनार्दन थळी, महेंद्र ठाकूर, जितेंद्र ठाकूर यांच्यासह नागावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, या गंभीर आरोपांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
