हजारो प्रवाशांचे हाल; संतप्त नागरिकांची रायगड विभाग नियंत्रकांकडे तक्रार दाखल
सोगाव । अब्दुल सोगावकर
मुंबई-गोवा महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचे आणि ‘कोकणाचे प्रवेशद्वार’ मानल्या जाणाऱ्या वडखळ बसस्थानकातून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना सध्या भीषण मनस्ताप सहन करावा लागत आहे. मागील काही महिन्यांपासून सुरू झालेल्या नवीन बाह्यवळण (बायपास) रस्त्यामुळे कोकणात जाणाऱ्या आणि येणाऱ्या लांब पल्ल्याच्या बहुतांश एसटी बसेस वडखळ बसस्थानकात न येता परस्पर बायपास मार्गे मार्गस्थ होत आहेत. एसटी प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, वडखळ येथील प्रवासी अभय पाटील यांनी थेट रायगड विभाग नियंत्रकांकडे १६ जून २०२६ रोजी लेखी तक्रार दाखल केली आहे.
दररोज हजारो प्रवाशांची कोंडी
वडखळ हे रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती आणि प्रमुख बसस्थानक आहे. येथून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे तसेच कोकणातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, महाड, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा यांसारख्या लांब पल्ल्याच्या ठिकाणी दररोज हजारो प्रवासी नोकरी, व्यवसाय आणि वैद्यकीय कारणांसाठी प्रवास करतात. मात्र, थेट बसेस बसस्थानकात येत नसल्याने प्रवाशांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागत आहे.
“एकीकडे एसटी प्रशासन ‘प्रवासी वाढवा, उत्पन्न वाढवा’ अशी घोषणा देत आहे, तर दुसरीकडे प्रत्यक्ष जागेवर प्रवाशांना वाऱ्यावर सोडले जात आहे. बायपासवरून जाणाऱ्या सर्व गाड्या वडखळ बसस्थानकात आणणे बंधनकारक करावे, अन्यथा प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक होईल.”
—अभय पाटील, तक्रारदार प्रवासी (वडखळ-डोलवी)
प्रवाशांची होत असलेली कोंडी आणि प्रमुख समस्या
थेट बस मिळत नसल्याने प्रवाशांना वारंवार बस बदलून प्रवास करावा लागत आहे, ज्यामुळे प्रवाशांना नाहक आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. बसस्थानकात गाड्या येत नसल्याने वृद्ध नागरिक, महिला, लहान मुले, स्तनदा माता आणि गंभीर आजारी रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. प्रवाशांना इच्छित स्थळी वेळेत पोहोचता येत नसल्याने नोकरदार आणि विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
तात्काळ कारवाईची मागणी
एसटी प्रशासनाने या समस्येची गंभीर दखल घेऊन सर्व लांब पल्ल्याच्या एसटी बसेस वडखळ बसस्थानकातूनच मार्गस्थ कराव्यात, अशी आग्रही मागणी तक्रार अर्जाद्वारे करण्यात आली आहे. आगामी काळात प्रवाशांच्या हिताचा निर्णय न झाल्यास आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा सूर आता स्थानिक प्रवाशांमधून उमटत आहे.
