• दिवेआगर, आदगाव समुद्र किनारी सापडले 60 किलो चरस
• 1 कोटी 80 लाख किंमत; रायगड पोलीस अधिक सतर्क
अभय पाटील
बोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिवेआगर तसेच आदगाव समुद्रकिनारी देखील मंगळवारी सायंकाळी चरस या अमली पदार्थाचे एकूण 46 पाकिटे पाण्यातून वाहत आलेली आढळून आली. पाकिटातील चरसची अंदाजे रक्कम 1 कोटी 84 लाख रुपये असल्याची माहिती मिळाली.
श्रीवर्धन तालुक्यात समुद्रकिनारी चरस वाहत येण्याचे प्रकार सुरूच असून सतत तिसऱ्या दिवशी मंगळवारी सायंकाळी दिवेआगर कोळीवाडा बाजूला चरस या अमली पदार्थाची 33 पाकिटे तर आदगाव समुद्रकिनारी 13 पाकिटे समुद्रातून वाहत आल्याचे पोलिसांना आढळून आले असून या एकूण 46 पाकिटांचे वजन 60 किलो असून एकूण रक्कम 1 कोटी 80 लाख रुपये असल्याचे समजते तर याआधी श्रीवर्धन, मारळ हरीहरेश्वर, आरावी, सर्वे या ठिकाणी अशीच पाकिटे मिळून आली होती. आज दिवेआगर व आदगाव या ठिकाणी चरस पाकिटे मिळून आली. या घटनेचा पंचनामा सहाय्यक पोलीस निरिक्षक डॉ. प्रसाद ढेबे, मुरुड पोलिस ठाणे पोलीस निरीक्षक श्रीम. जाधव, पोलीस नाईक प्रकाश सुर्वे, पोलीस हवालदार संदिप चव्हाण, गुणवंत जाधव, शासकीय पंच उपविभागीय अधिकारी कार्यालय श्रीवर्धन नायब तहसीलदार आर. के. केमनाईक, ग्रामविकास अधिकारी शंकर मयेकर, चंद्रकांत गोवारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला असून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समुद्रकिनारी मिळून असलेल्या चरस पाकिटांमुळे रायगड पोलीस सतर्क झाले आहेत.