वैशाली कडू
उरण : गेले अनेक दिवसापासून पावसाने दडी मारली होती. मात्र आज पहाटेपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे गोविंदा पथकात उत्साहाचे वातावरण पसरले होते. त्यात गोविंदा आला रे…आला…गोविंदा रे गोपाला, यशोदेच्या तान्ह्या बाळा अशा घोषणांनी निनादणारा आसमंत…डिजेच्या तालावर पावसाच्या धारा झेलत एकावर एक मानवी मनोऱ्यांची सलामी दिली जात होती.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांनी आज ज्याप्रमाणे गोविंदा पथक एकमेकांना वरती चढण्यासाठी मदत करीत आहेत, त्याचप्रमाणे उरणच्या विकासासाठी अशाच प्रकारे एकमेकांना साथ देत सर्व सण साजरे करण्याचे आवाहन दहीहंडी फोडण्यासाठी येणाऱ्या गोविंदा पथकांना व उपस्थितांना केले. यानंतर यमुनेच्या तिरी काल पाहीला हरी, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा यांसारख्या गीतांवर गोविंदांसह साऱ्यांनाच ठेका धरायला लावणारे वातावरण अशा उत्साहपूर्ण वातावरणाने उरण ग्रामीण व शहर गोविंदामय झाल्याचे पहायला मिळत होते.

उरणमध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने दहिहंडी उत्सवाचे आयोजन विविध भागात करण्यात आले आहे. शहरातील बॅनर, कमानी यामुळे राजकीय पक्षांतील चुरस दिसून येत असून गोविंदाचा उत्साह देखील गुरुवारी सकाळपासून दिसून येत होता. गुरुवारी मध्यरात्री 12 वाजताच्या दरम्यान श्री कृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सकाळपासून पावसाची संततधार सुरु असल्याने अनेक गोविंदा हे पावसात चिंब भिजल्याने थरथरत होते. मात्र त्यातही त्यांचा उत्साह कमी झाल्याचे दिसून येत नव्हते. आयोजकांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी वैद्यकीय व्यवस्था उभी करत गोविंदांना सहकार्य केल्याचे पहायला मिळाले. यामध्ये अनेक लहान लहान गोविंदांचा देखील समावेश यावेळी दिसून आला. पावसात भिजून गोविंदा आजारी पडू नये यासाठी सातत्याने काळजी घेण्याचे आवाहन आयोजकांकडून केले जात होते.
उरण शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), भाजपा, शिवसेना व इतर पक्षाने दहीहंडी बांधली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.
