असे प्रकार वारंवार घडत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप
घन:श्याम कडू
उरण : आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास उरण ओएनजीसी प्रकल्पमधून कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणात गळती झाली. सदर गळती ही मांगीन देवी मंदिराला लागून असणाऱ्या नाल्यातून एचआय गळती झाली असून, या तेलाचा प्रचंड तवंग येथील नाल्यासह समुद्राच्या पाण्यावर पसरला आहे. त्यामुळे तेलाचा वास येथील परिसरामध्ये पसरला होता. असे प्रकार कंपनीकडून वारंवार होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करून याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर उरणची भोपाळपेक्षाही भयानक परिस्थिती होईल. याची खबर शासकीय यंत्रणेला देऊनही कोणताच अधिकारी घटनास्थळी आलेला दिसत नाही असे ग्रामस्थांनी सांगितले.

पहाटे तेल गलती झाल्याचे लक्षात येताच प्रकल्पाकडून नाल्यातून समुद्रामध्ये मिसाळणारे तेल थांबावण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे. तर किनाऱ्यावर आलेल्या तेलाचा जाड थर जमा करण्यासाठी उरण ओएनजीसी प्रकल्पामधून होणारी तेल गळती थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. किनाऱ्यावर आलेला तेलाचा जाड थर जमा करण्यासाठी कर्मचाऱ्यांसह सक्शन पंप, ड्रम, सक्शन वॅन घटनास्थळी कार्यरत झाल्या आहेत. दरम्यान, येथील नाल्यातून बाहेर येणारे तेल येथील पिकत्या शेत जमिनीमध्ये जात असल्याने शेतपिकाचे नुकसान होणार असल्याचा दावा येथील शेतकरी करत आहेत. तर समुद्राच्या पाण्यामध्ये तेल मिसळल्याने किनारी भागावरील मासे आणि तत्सम जीव धोक्यात आले आहेत. यावर उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांनाही याचा फटका बसणार आहे.

ओएनजीसी प्रकल्पामधून अशा प्रकारे अनेकदा तेल गळती झाली असून, घडलेल्या घटनांमधून आजवर पाच जणांचा जीव गेला आहे. यामध्ये एक स्थानिक नागरिक, तीन अग्निशमन दलाचे जवान आणि एका प्लांट मॅनेजरचा समावेश आहे. अशा संवेदनशील ओएनजीसी प्रकल्पामधून नियमित तेल आणि गॅसच्या वासामुळे येथील नागरिकांना महाभयंकर आजारांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी लेखी तक्रार करूनही कोणतीच कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. मात्र, त्याहीपेक्षा अशा घटनामधून होणारे अपघात आणि त्याची दाहकता एखाद्या दिवशी उरणची भोपळपेक्षाही बिकट अवस्था होण्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. याबाबत ग्रामपंचायतही कोणतीच ठोस भूमिका घेत नसल्याने त्यांची भूमिका ग्रामस्थांना संशयास्पद वाटत आहे.

सदरचे काम हे काही दिवसांपूर्वी ठेकेदाराला वर्ग करण्यात आले आहे, त्यामुळे ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याची माहिती कंपनीच्या कामगारांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. सदर कंपनीमध्ये सरकार नावाचा ठेकेदार कामगारांना कोणतीच सुरक्षा अथवा पगार वेळेवर देत नसल्याची माहिती कामगारांनी दिली. तरी कंपनी प्रशासन व शासकीय यंत्रणेने याची वेळीच दखल घ्यावी अन्यथा त्याचे दुष्परिणाम येथील स्थानिक जनतेला भोगावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
