• Mon. Feb 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शाडूच्या गणेशमुर्तीची कला जिवंत ठेवणारे चिरनेरचे कलानगर

ByEditor

Sep 8, 2023

अनंत नारंगीकर
उरण :
यावर्षी अधिक मास महिन्यामुळे श्री गणेश चतुर्थी उत्सव दि. १९सप्टेंबर रोजी मंगळवारी येत असल्याने व अवघे दहा दिवसांचा कालावधी राहिल्याने चिरनेर कलानगरमधील मुर्तीकारांनी शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तीना रंगकाम करण्यास सुरुवात केल्याचे चित्र कलानगरात पहावयास मिळत आहे.

पेणच्या गणेशमूर्ती कलेला तोडीस तोड देणारे चिरनेर कलानगरातील २२ कुंभार समाजाचे कुटुंब सुमारे ६५ वर्षापासून माती बरोबरच शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती घडविण्याचे काम करत आहेत. कुंभार समाजाला शेती नसल्याने आपल्या कलेच्या पाठबळावर उन्हाळ्यात मातीची भांडी आणि गणेशमूर्ती, नवरात्रोत्सवात दुर्गामातेच्या मुर्ती घडवून कुंभार समाजाचे बांधव आपआपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. सध्या चिरनेर कलानगरमधील गजानन चौलकर, प्रसाद चौलकर, नंदकुमार चिरनेरकर, रमेश म्हशीलकर, दामु आण्णा चौलकर, प्रकाश चिरनेरकर, नारायण चौलकर, भालचंद्र हातनोलकर, उरण तालुका कुंभार समाज अध्यक्ष विष्णू चौलकर, विलास हातनोलकर, रंगनाथ चौलकर, भाई चौलकर, दिपक गोरे, नरेश हातनोलकर, नारायण हातनोलकर या कलाकारांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्ती न घडविता पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या मूर्ती घडविण्याच्या कामांना प्राधान्य दिल्याचे चित्र कलानगरात पहावयास मिळत आहे.

चिरनेर कलानगरमधील मुर्ती कलेला जागेचा अभाव व आर्थिक पाठबळाच्या अभावामुळे मर्यादा पडल्या आहेत. तसेच शाडूच्या मातीत व रंगाच्या किंमतीत होणारी प्रचंड वाढ यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यात सातत्याने खंडीत होणारा विद्युत पुरवठा यामुळेही त्रास सहन करावा लागत आहे. तरीही आज प्रत्येक कारखान्यात मुर्ती कारागीर शाडूच्या मूर्तीच्या ७५ ते २५० लहान मोठ्या मूर्ती घडविण्याचे काम करत आहेत. चिरनेर कलानगरातील घडविण्यात येणाऱ्या गणेशाच्या मूर्ती या उरण, पनवेल बरोबर नवीमुंबई, ठाणे, मुंबई सारख्या शहरात गणेशभक्त घेऊन जात आहेत. गावातील खड्डेयुक्त रस्त्यांचा त्रास गणेशभक्तांना सहन करावा लागत आहे. तरी स्थानिक ग्रामपंचायत, शासनाने मुर्ती कारागिरांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली तर कुंभार समाज पुढेही ही कला जिवंत ठेवणार आणि या कलेच्या पाठबळावर समाजाची उन्नती होईल

प्रसाद चौलकर
मुर्तीकार

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!