• Wed. Sep 2nd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धन शहरातील अनधिकृत बांधकामांवर प्रशासनाचा हातोडा; गटारे आणि रस्ते केले मोकळे

ByEditor

Sep 2, 2026

श्रीवर्धन । अनिकेत मोहित 
 शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या बाजारपेठेतील रस्ते, गटारे आणि सार्वजनिक जागांवरील अनधिकृत बांधकामे तसेच रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या व्यवसायांविरोधात श्रीवर्धन नगर परिषद आणि श्रीवर्धन पोलिस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली.

बाजारपेठेतील अरुंद रस्त्यांवर दुकानदारांकडून करण्यात आलेले अतिक्रमण, गटारांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत रचना तसेच रस्त्याच्या कडेला व्यवसायासाठी ठेवण्यात आलेले साहित्य यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः गर्दीच्या वेळेत या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत असल्याने प्रशासनाने ही कारवाई केली.

या कारवाईदरम्यान नगर परिषद कर्मचारी आणि पोलिसांनी बाजारपेठेतील रस्त्यांची पाहणी करून रस्त्यावरील अडथळे हटविण्यास सुरुवात केली. काही ठिकाणी रस्त्यावर ठेवण्यात आलेले साहित्य व अनधिकृत स्वरूपातील बांधकामे हटविण्यात आली. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठीही उपाययोजना करण्यात आल्या.

दरम्यान, बाजारपेठेतील रस्ते आणि गटारांची जागा मोकळी झाल्यास वाहतुकीला मोठा दिलासा मिळू शकतो, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. मात्र, केवळ एकदाच कारवाई न करता भविष्यात पुन्हा अतिक्रमणे होणार नाहीत यासाठी नगर परिषद आणि पोलिस प्रशासनाने नियमित पाहणी व सातत्यपूर्ण कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!