मुंबई: राज्य महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ (जनसंपर्क अधिकारी) आशिष मेटे यांचा भांडुप येथे दुर्दैवी मृत्यू झाला. इमारतीच्या आवारात शतपावली करत असताना अचानक खाली कोसळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा प्राण गेला.
नक्की काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष मेटे हे भांडुप परिसरातील एका इमारतीच्या आवारात रात्रीचे जेवण झाल्यानंतर फिरत होते. त्यावेळी अचानक त्यांचा तोल गेला आणि ते जमिनीवर कोसळले. या घटनेत त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
खासगी एजन्सीमार्फत नियुक्ती
आशिष मेटे हे थेट शासकीय सेवेत नसून एका खासगी पब्लिक रिलेशन (PR) एजन्सीच्या माध्यमातून मंत्री अदिती तटकरे यांच्या कार्यालयासाठी कार्यरत होते. मंत्र्यांच्या कार्यालयातील प्रसिद्धी आणि जनसंपरकाची सर्व कामे ते पाहत होते.
या घटनेप्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची (Accidental Death) नोंद करण्यात आली असून, त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय व जनसंपर्क क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
