• Wed. Sep 2nd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये युरियाचा तीव्र तुटवडा; कृषी विभागाच्या बेजबाबदार कारभारामुळे शेतकरी हवालदिल

ByEditor

Sep 2, 2026

ऑनलाइन प्रणालीची किचकट डोकेदुखी; ‘खत विक्रेत्यांच्या डोक्यावर बसा’, कृषी अधिकाऱ्याचे धक्कादायक विधान

​उरण | अनंत नारंगीकर
उरण तालुक्यात सध्या युरिया खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून हक्काच्या खतासाठी शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने तालुक्यातील भातपिके उत्तम स्थितीत आहेत. सध्या पिकांना खताची अत्यंत गरज असताना तालुक्यातील एकाही कृषी केंद्रावर युरिया उपलब्ध नसल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे.

​खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कृषी विभागाने १५ ऑगस्ट २०२६ पासून ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFS) ही नवीन ऑनलाइन खत विक्री प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीनुसार शेतकरी आयडी किंवा आधार कार्डच्या मदतीने ॲपवर लॉग इन करून, पिकाच्या गरजेनुसार QR कोड किंवा टोकनद्वारे खत खरेदी करणे अपेक्षित आहे. परंतु, ही ऑनलाइन पद्धत अत्यंत किचकट असून ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोनच उपलब्ध नाहीत. त्यातच प्रत्यक्ष दुकानांमध्ये खत उपलब्ध नसल्याने या नव्या प्रणालीचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा झालेला नाही.

​उरण तालुक्यातील बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण खताची पिशवी खरेदी करणे लहान शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते. पिकांच्या गरजेनुसार कमी प्रमाणात खत न मिळणे आणि बाजारातील तुटवडा, यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

​या गंभीर परिस्थितीबाबत उरण तालुक्याच्या कृषी अधिकारी अर्चना सूळ ननावर यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांच्या बेजबाबदार भूमिकेमुळे संताप व्यक्त होत आहे. “आपण कृषी केंद्र चालकांना खत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत, परंतु विक्रेते खत आणण्यास नकार देत असल्याने आपली जबाबदारी संपली आहे,” असा अजब दावा त्यांनी केला. एवढेच नव्हे तर ‘तुम्हीच आता त्या खत केंद्रांच्या मालकांच्या डोक्यावर बसून खते उपलब्ध करून घ्या’ असे बेजबाबदार उत्तर त्यांनी दिल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र असंतोष पसरला आहे.

​तालुक्यातील कृषी विभागाच्या ढिसाळ कारभाराबाबत आधीपासूनच तक्रारींचा पाढा आहे. शासनाच्या कल्याणकारी योजनाही सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप होत आहे. ऐन पिकांच्या वाढीच्या काळात खतांचा तुटवडा आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे उरणमधील भातशेती धोक्यात आली असून, आता दाहीदिशा भटकणाऱ्या शेतकऱ्यांनी न्याय कोणाकडे मागावा, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!