सलीम शेख
माणगाव : मुंबई-गोवा महामार्गाचे गेली १३ वर्षापासून कोकणवासियांचे दुखणे कायमच राहिले आहे. या मार्गाची दुरवस्था झाली असून इंदापूर ते वडपाले या टप्यातील अनेक भागात महामार्ग उखडला गेला आहे. त्यामुळे रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यातील खडी बाहेर निघाली आहे. त्यामुळे वाहनांचे टायर पंक्चर होत आहेत. तसेच वाहनेही नादुरुस्त होत असल्याने या रस्त्याचा फटका प्रवासी चालकांना बसत आहे. मात्र कोकणातील लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे या महामार्गाचे काम रखडले आहे. अवघ्या आठ दिवसावर गणेशोत्सव आला असताना महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. तर कांही ठिकाणी रस्त्याची कामे चालू आहेत. माणगाव व इंदापूर बायपासही अपूर्ण आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी महामार्गावरून गावी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना खड्ड्यांच्या विघ्नांतुन प्रवास करावा लागणार आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम केव्हा पूर्ण होणार असा सवाल नागरिक करीत आहेत.
गणेशोत्सव आठ दिवसावर येऊन ठेपला असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी यापूर्वी मुंबई – गोवा महामार्गाची पाहणी दौरा केला. गणेशभक्तांना यंदाचे वर्षी प्रवास सुखकर व्हावा यासाठी मंत्री महोदयांनी सिंगल लेन पूर्ण करण्याची हमी दिली होती. त्यामुळे गणेशभक्तांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र इंदापूर ते वडपाले दरम्यान महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. तसेच माणगाव व इंदापूर येथील बायपासचे काम अपूर्ण असल्यामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना या शहरात वाहतूक कोंडीशी सामना करावा लागणार आहे. त्यामुळे कोकणच्या प्रवासाला बायपासचे विघ्न कायमच रहाणार आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली १३ वर्ष रखडले असून सद्यस्थितीत या महामार्गाची अत्यंत गंभीर अवस्था झाली असून या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण होण्यासाठी राज्यकर्त्यांनी विशेष लक्ष देण्याची मागणी जनतेतून होत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होणारे लहान-मोठे अपघात तसेच या अपघातांतून अनेकांचे जाणारे जीव व अनेकांना आलेले कायमचे अपंगत्व पाहता हा महामार्ग जणू काही मृत्यूचा सापळाच बनला आहे. या महामार्गाचे काम गेली १३ वर्ष रखडले असून कोकण वासीय त्याची यातना भोगत आहेत. पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्याचे कामही अजून व्यवस्थित पूर्ण झालेले नाही.
इंदापूरपासून पुढे असणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील माणगावचा बायपासचा प्रश्नही खितपत पडला आहे. बायपासच्या कामाची रखडपट्टी यामुळे माणगाव शहरात सातत्याने शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी व सणांच्या दिवशी वाहनांच्या १० किमी पर्यंत रांगा लागून वाहतूक कोंडी होत असते. त्यातच गणेशोत्सव जवळ आल्याने या गणेशभक्तांना यांचा फटका बसणार आहे. माणगाव शहराला चारही बाजूनी रस्ते मिळत असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. माणगाव शहराला बायपास रस्ता होत असून तोही रस्ता भविष्यात अपुरा पडणार आहे. माणगाव शहराच्या पूर्वेकडून कळमजे फाटा ते ढालघर गावाच्या पुढे असा ६ कि.मी. बायपास होणार आहे. त्यामुळे कांही अंशी वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.
माणगाव हे जिल्ह्याचे ठिकाण म्हणून भविष्यात नवी ओळख निर्माण करेल यासाठी माणगाव शहराच्या पश्चिमेकडून रिंग रोड बनवून रस्ता काढता येईल जेणे करून माणगाव बायपासवरही वाहतूक कोंडी होणार नाही. रत्नागिरी जिल्ह्यातून मंडणगड, दापोली व रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळा, दिवेआगार, हरिहरेश्वर व परिसरातील पर्यटन क्षेत्रावर सहज पर्यटकांना जाता येईल
–अस्लम राऊत
शेकाप नेते, मोर्बा
