दिघी | गणेश प्रभाळे
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परिसरातील ९ गावांमध्ये गेल्या महिनाभरापासून बीएसएनएलची मोबाईल व इंटरनेट सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने त्रस्त ग्रामस्थांनी मंगळवारी म्हसळा येथील बीएसएनएल कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
कासारकोंड, धनगरमलई, नागलोली मधलीवाडी, नागलोली, नागलोली नवीवाडी, देवखोल, बोर्ला, बोर्ला रसाळवाडी आणि वावेपंचतन या १६०० हून अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये सुमारे १० वर्षांपूर्वी बीएसएनएलचा टॉवर उभारण्यात आला होता. मात्र, दशकभरानंतरही येथील नेटवर्कची समस्या कायम आहे. यंत्रणेत सतत होणारे बिघाड आणि संथ दुरुस्तीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
आपत्कालीन प्रसंगी संपर्क यंत्रणा ठप्प
या परिसरातील अनेक नागरिक रोजगारासाठी मुंबईसारख्या शहरांत स्थायिक आहेत. मात्र, मोबाईल आणि इंटरनेट सेवा ठप्प असल्याने कौटुंबिक संपर्कासोबतच वैद्यकीय आणीबाणी, अपघात अथवा इतर आपत्कालीन प्रसंगी मदतीसाठी संपर्क साधणे कठीण झाले आहे. श्रीवर्धन येथील बीएसएनएल कार्यालयात तक्रार निवारणासाठी अधिकारीच उपलब्ध नसतात, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
”सरकारी दूरसंचार सेवा असूनही नियमित नेटवर्क मिळत नाही. ग्राहकांकडून नियमित सेवा शुल्क आकारले जात असल्याने सुरळीत सेवा देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.”
— सुनील रिकामे (नागलोली रहिवासी, मुंबई)
”नेटवर्कअभावी आपत्कालीन प्रसंगी कोणाशीही संपर्क साधता येत नाही. ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा हा गंभीर प्रश्न आहे.”
— जयेश जाधव (स्थानिक रहिवासी)
”तंत्रज्ञानातील बिघाडामुळे सेवा विस्कळीत झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना परिस्थितीची कल्पना दिली असून लवकरच नेटवर्क पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”
— तुषार चौधरी (अधिकारी, बीएसएनएल)
प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
दहा वर्षांपूर्वी टॉवर उभारूनही नेटवर्कचा प्रश्न सुटलेला नसल्याने बीएसएनएलच्या देखभाल व दुरुस्ती यंत्रणेवर ताशेरे ओढले जात आहेत. आता या धडक मोर्चानंतर तरी बीएसएनएल प्रशासन या ९ गावांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
