• Tue. Sep 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

१ ऑक्टोबरपासून ‘भाऊचा धक्का ते रेवस’ प्रवासी बोटसेवा पूर्ववत!

ByEditor

Sep 29, 2026

उरण । घनःश्याम कडू
पावसाळी हंगामामुळे गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेली ‘भाऊचा धक्का (मुंबई) ते रेवस’ प्रवासी बोटसेवा गुरुवार, १ ऑक्टोबरपासून पुनश्च सुरू होत आहे. मुंबई जलवाहतूक संस्थेने याबाबत अधिकृत घोषणा केली असून, या निर्णयामुळे अलिबागसह संपूर्ण दक्षिण कोकणात ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरवर्षी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून २५ मे पासून भाऊचा धक्का-रेवस, मोरा-भाऊचा धक्का आणि गेटवे ऑफ इंडिया-मांडवा या तीनही सागरी जलवाहतूक सेवा तात्पुरत्या स्थगित केल्या जातात. यंदा मोरा आणि मांडवा जलवाहतूक सेवा सप्टेंबर महिन्यातच पूर्ववत झाली होती. मात्र, अरबी समुद्रातील बदलणारे हवामान आणि सागरी स्थिती अनुकूल नसल्याने रेवस बोटसेवा सुरू होण्यास काहीसा विलंब झाला होता. आता समुद्रातील वातावरण पूर्ववत झाल्याने ही सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई जलवाहतूक संस्थेचे सचिव शराफत मुकादम यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबरपासून भाऊचा धक्का येथून दररोज सकाळी ६:३०, ८:००, १०:०० वाजता आणि दुपारी १२:००, १:०० व ५:०० वाजता रेवससाठी बोटी सुटणार आहेत. प्रतिप्रवाशी तिकीट दर १०० रुपये निश्चित करण्यात आला आहे.

दरम्यान, समुद्रातील लाटांची स्थिती आणि अचानक होणाऱ्या हवामान बदलांनुसार बोटींच्या वेळापत्रकात आवश्यकतेनुसार बदल केला जाऊ शकतो, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. १ ऑक्टोबरपासून ही सेवा सुरू होत असल्याने भाऊचा धक्का आणि रेवस दोन्ही बंदरांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!