दिघी सागरी पोलीस ठाणे येथे शांतता समितीची सभा संपन्न
अभय पाटील
बोर्लीपंचतन : गावच्या प्रत्येक सणांमध्ये एक वेगळा आनंद आहे, पारंपरिक पद्धतीने सण फक्त गावाकडे साजरे होतात त्यामुळे डीजे ऐवजी आपण पारंपारीक वाद्यांचा वापर करून आताचा नवरात्र सण कोणाच्याही भावना न दुखावता आनंदाने व पारंपारिक पद्धतीने साजरा करावा असे आवाहन दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. प्रसाद ढेबे यांनी केले. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतता समितीची सभा संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.
नवरात्र सण व धम्मचक्र दिनाच्या अनुषंगाने दिघी सागरी पोलीस ठाण्यामध्ये शांतता समिती सदस्य, पोलीस पाटील, नवरात्रौत्सव मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. प्रसाद ढेबे, माजी जिल्हा परिषद सदस्य शामकांत भोकरे, नंदकुमार पाटील, शब्बीर फकीर, दांडगूरी उपसरपंच दत्तात्रेय पांढरकामे, पोलीस पाटील संघनटनेचे दिलीप नाक्ती, भालचंद्र नाक्ती, शंकर गाणेकर तसेच दिघी सागरी पोलीस ठाणे हद्दीतील नवरात्रौत्सव मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, पत्रकार आदी उपस्थित होते.
यावेळी आपल्या मनोगतामध्ये दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. प्रसाद ढेबे यांनी सांगितले की, नवरात्र उत्सवामध्ये धार्मिक भावना दुखावणार नाही याची काळजी घ्या, आपल्या गावाकडे साजरा होणाऱ्या प्रत्येक सणांमध्ये वेगळा आनंद आहे तो प्रत्येकाने टिकवला पाहिजे, डीजे पेक्षा आपल्या पारंपारिक वाद्यामध्ये गोडवा जास्त आहे. पांरपारीक वाद्य पुढील काळामध्ये टिकली पाहिजे यासाठी डीजे ऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करा, वेळेची मर्यादा प्रत्येक मंडळाने काटेकोर पाळा, कोणताही अनुचित प्रकार होत असेल तर पोलिसांना कळवा पण होणारा प्रकार आपल्या समाज स्तरावर मिटविण्याच शक्यतो टाळा, आपला सण पारंपरिक पद्धतीने साजरा करा असे आवाहन त्यांनी केले. उपस्थितांमधून शामकांत भोकरे, नंदकुमार पाटील यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले.
