• Thu. Feb 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रसायनयुक्त पाण्यामुळे टेमघर नाल्यात शेकडो मृत माशांचा खच!

ByEditor

Nov 10, 2023

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी झोपी गेले का? ग्रामस्थांचा सवाल

मिलिंद माने
महाड :
महाड औद्योगिक वसाहतीमधील टेमघर नाल्यामध्ये बुधवारी सकाळी मोठ्या प्रमाणावर शेकडो मृत मासे तरंगत असताना आढळून आले. टेमघर नाल्याच्या पाण्यावर देखील पांढऱ्या पावडरचा थर दिसून आल्याने येथील केवा कंपनीवर कारवाई करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाने तयार केल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असताना व मासे मृत पावत असताना महामंडळाचे अधिकारी झोपी गेलेत का? असा सवाल ग्रामस्थ राज्य सरकारला विचारीत आहेत.

महाड औद्योगिक क्षेत्रात गटारांमध्ये रासायनिक पाणी सोडण्याचे उद्योग हे औद्योगिक वसाहतीमधील आजूबाजूच्या गावांना नवीन नाहीत. दरवर्षी पावसाळ्यात अनेक कारखाने छुप्या मार्गाने रासायनिक सांडपाणी सोडून देतात. असाच प्रकार बुधवारी महाड तालुक्यात अवकाळी पावसाचा फायदा घेत एमआयडीसीमधील टेमघर नाल्यात कोणत्या तरी कारखान्याने रासायनिक पाणी सोडल्याने या नाल्यात शेकडो मासे मृत्यू मुखी पडले.

महाड औद्योगिक वसाहतीमधील टेमघर नाल्यात माशांच्या छोट्या पिल्लांपासुन ते एक फूट भर लांबीच्या माशांचा मृत्यू झाला आहे. महाड औद्योगिक वसाहतीमधील टेमघर नाल्यात यावेळी नदीमध्ये पांढऱ्या रंगाच्या पावडरचा थर आणि फेस देखील दिसत होता. अवेळी पावसाचा गैरफायदा घेत महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रदुषणकारी कारखान्यांचे हे प्रताप असुन प्रदुषण नियंत्रण मंडळाने यावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून वारंवार केली जात आहे.

महाड औद्योगिक वसाहती मधील आजूबाजूच्या गावातील स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने संपूर्ण नाल्याची तपासणी करून पाण्याचे नमुने घेतले आहेत. नाल्यामध्ये असलेल्या पांढऱ्या रंगाची पावडर सी प्लॉट मधील केवा, (व्ही एन क्रिएटीव्ही) कंपनीच्या गेटपासून आढळून येत आहे. तर याच नाल्यात मोठ्या प्रमाणात ॲसिडिक पाणी देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या कारखान्यावर कारवाईसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

महाड औद्योगिक वसाहतीमधील टेमघर नाल्याची पाहणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली असून प्रदूषणकारी पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. महाड औद्योगिक वसाहतीमधील टेमघर नाल्यामध्ये जी पावडर दिसून येत आहे, ती पावडर केवा एन या कारखान्याच्या गेटपासून दिसून येत आहे. वरिष्ठ कार्यालयात या करखान्यावर कारवाईसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे अशी माहिती संदीप सोनवणे, क्षेत्र अधिकारी प्रदूषण मंडळ महाड यांनी दिली. महाड औद्योगिक वसाहतीमधील टेमघर नाल्यात ज्या कंपनीकडून प्रदूषण झाले आहे त्या कंपनीच्या विरोधात कारवाईसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला असला तरी राजकीय वरदहस्तामुळे या कंपनीवर कारवाई होईल का? असा सवाल स्थानिक नागरिक विचारित आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!