• Thu. Feb 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

चेंढरे आणि संभाजीवाडा येथून बेपत्ता झालेल्या दोन्ही युवती गुजरात राज्यातील खेडा येथे सापडल्या

ByEditor

Nov 10, 2023

अमूलकुमार जैन
अलिबाग :
अलिबाग तालुक्यातील चेंढरे आणि संभाजी वाडा येथून बेपत्ता झालेल्या दोन्ही युवती या गुजरात राज्यातील पिपलग, पेटली वगो तालुका खेडा जिल्हा नदियाड येथे सापडल्या आहेत. अलिबाग तालुक्यातील चेंढरे येथील युवती वय 18 वर्षे ही बेपत्ता झाली असल्याची तक्रार युवतीची आई हिने अलिबाग पोलिस ठाण्यात दिली होती. तसेच संभाजीवाडा येथून 19 वर्षीय युवती ही बेपत्ता झाली असल्याची तक्रार युवतीचे वडील यांनी सुद्धा अलिबाग पोलिस ठाण्यात दिली होती.

दोन्ही बेपत्ता झालेल्या युवती ह्या मैत्रिणी असून त्या नीटच्या परीक्षेची तयारी करत होत्या. तसेच त्यातील संभाजीवाडा येथील युवती हिला ॲक्टिंग, डान्सिंगमध्ये करियर करायचे होते मात्र घरच्यांचा विरोध होता. दोन्ही युवती ह्या अफजर फरुकमिया मलिक (वय 21 वर्षे, पिपलग,पेटली वगो तालुका खेडा जिल्हा नदियाड, राज्य गुजरात) हा चेंढरे येथील युवतीचा इंस्टाग्रामवरील मित्र आहे. ते दोघेही इंस्टाग्रामच्या माध्यमातून संपर्कात होते. अफजल हा डोळ्यांनी दिव्यांग असून ऑनलाईन नॉव्हेल्स लिहीतो असे भासविण्यात आले होते. अफजल आणि संभाजीवाडा येथील युवतीची ओळख चेंढरे येथील युवतीने दोन महिन्यापूर्वी करून दिली होती. तदनंतर ते एकमेकांच्या संपर्कात होते. अफजल आणि चेंढरे येथील युवतीने एक महिन्यापूर्वी घर सोडून जाण्याचे ठरविले होते. त्याची कल्पना तिने दिली होती. त्यावेळी संभाजीवाडा येथील युवतीने सुद्धा सोबत येते असे सांगितले. दि. 2 नोव्हेंबर 2023 रोजीपासून घर सोडून जाण्याची चर्चा इंस्टाग्रामच्या माध्यमातून सुरू होती. चेंढरे येथील युवतीने दि. ४/११/२०२३ रोजी एसटी स्टॅन्ड येथून दि. ५/११/२०२३ रोजीच्या रात्री २ वाजतासाठी एक कॅब बुक केली होती. त्याप्रमाणे कॅब संभाजीवाडा येथील घराजवळ आली. त्यामध्ये बसून ती चेंढरे येथील युवतीच्या घरी गेली. दरम्यान, संभाजीवाडा येथील युवतीने एटीएम मधून ८०००/- रुपये काढले. चेंढरे आणि संभाजी वाडा येथील दोन्ही युवती ह्या रात्री २ वाजण्याचे दरम्यान अलिबाग येथून पुणे येथे रेल्वे स्टेशनला गेल्या. दि. ६/११/२०२३ रोजी सायंकाळी ७ वाजताची जोधपूर एक्सप्रेसची तिकीट बुक करून सदर एक्सप्रेसने गुजरात येथे सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्या दोघी गुजरात राज्यात पोहोचल्या. तेथे पोहचल्यानंतर अफजल याचा पत्ता विचारत ९:३० वाजण्याचे सुमारास अफजल याच्य घरी पोहचल्या. दि. ७/११/२०२३ व ८/११/२०२३ रोजी दोघी अफजलला सोबत घेवून जॉब व राहण्यासाठी रुम शोधत होत्या. परंतू त्यांना रुम व जॉब मिळाला नाही. म्हणून त्या दोघी अफजल याचे घरी त्याचे आई वडीलांसोबत राहील्या. तेथेच दोघींनी जेवण वगैरे केले.

दि. ९/११/२०२३ रोजी अलिबाग पोलीस ठाण्यातील पोलीस शोध घेत अफजल याच्या घरी पोहोचले. त्यांनी दोघींना नदियाल ग्रामीण या पोलीस ठाण्यात नेले. तेथे दोघींची विचारपुस करण्यात आली. त्यावेळी दोघी युवतींनी आम्ही स्वखुशीने आमचे वैयक्तिक आयुष्य जगायला व करीयर करायला आलो आहोत असे सांगितले. सदर दोन्ही युवती यांना आई वडील यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. रायगड पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथकं तयार करून गुन्हे अन्वेषण शाखेचे सहा. पोलिस निरीक्षक नागेश कदम, पोलिस हवालदार प्रतीक सावंत, विलास आंबेटकर यांच्या पथकाने यशस्वीरित्या तपास पूर्ण केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!