ठाकरे गटाचे महाड विधानसभा समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांची मागणी; अन्यथा न्यायालयात जाणार
मिलिंद माने
महाड : रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीमध्ये झालेल्या 11 कामगारांच्या मृत्यूप्रकरणी नेमण्यात आलेली समिती ही निःपक्षपाती काम करेल याबाबत साशंकता असल्याने ही समिती बरखास्त करा अन्यथा या समितीच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा महाड विधानसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे समन्वयक व शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे
महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीमध्ये 3 नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटात व त्यानंतर लागलेल्या आगीमध्ये कंपनीतील 11 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. या कामगारांच्या मृत्यूप्रकरणी रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हशे यांनी महाडचे उपविभागीय प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यांची चौकशी समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक केशव केंद्रे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी. एस. हरलया, पनवेल येथील कामगार उपायुक्त बाबासाहेब वाघ, महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जे .एस. हजारे, महावितरणचे गोरेगाव येथील कार्यकारी अभियंता आर. जे. पाटील, महाड येथील अग्निशामक दलाचे अधिकारी प्रवीण घोलप व महाडचे तहसीलदार महेश शितोळे आदी सदस्यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीतील 11 कामगारांच्या मृत्यू प्रकरणात महाड विधानसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे समन्वयक व शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी महाडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले की, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक केशव केंद्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असताना त्यांना या चौकशी समितीमध्ये समाविष्ट करून घेतल्याने ब्लू जेट हेल्थ केअर कंपनीची चौकशी निःपक्षपाती कशी होईल? असा सवाल त्यांनी उपस्थित करून, ही समिती बरखास्त करावी अन्यथा मी न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याचे सांगितले.
महाडचे आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचा या कंपनीशी कोणता थेट संबंध आहे असा सवाल करून विकास गोगावले यांच्याकडे कोणतेही शासकीय पद नसताना ते मृत कामगारांच्या नातेवाईकांना शासकीय धनादेशाचे वाटप शासकीय अधिकाऱ्यांसमवेत कोणत्या अधिकाराने करतात?असा सवाल ओझर्डे यांनी उपस्थित केला. ब्लू जेट हेल्थकेअर कंपनी विरोधात कारवाई करण्यासंदर्भात आमदार गोगावले का भूमिका घेत नाहीत? असा सवाल देखील ओझर्डे यांनी या निमित्ताने उपस्थित केला. आमदार गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आहेत असे सांगून ओझर्डे म्हणाले की, केवळ कंपनीतून भंगार विकायचं आहे व स्वतःच पोट भरायचे आहे. विकास गोगावले यांची स्वतःची काही ओळख नाही केवळ आमदाराचा मुलगा म्हणून त्यांची ओळख आहे. कोणावर टीका करताना आपली स्वतःची ताकद ओळखून टीका करावी. विकास गोगावले यांच्याकडे जे पद आहे ते अधिकृत रजिस्टर आहे का? असा सवाल देखील ओझर्डे यांनी उपस्थित केला.
रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी बंदुकीचा परवाना कसा दिला?
महाडचे आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यावर तडीपारीचा गुन्हा दाखल असताना तसेच अन्य गुन्हे दाखल असताना त्यांना बंदुकीचा परवाना रायगड जिल्हा अधिकाऱ्यांनी कसा दिला असा सवाल देखील ओझर्डे यांनी उपस्थित केला तसेच महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे हे विकास गोगावले यांच्यासमोर थरथर कापतात असा भयानक गौप्यस्फोट त्यांनी यावेळी उपस्थित केला.
महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्ल्यू जेट हेल्थ कंपनीचे बांधकाम अर्धवट अवस्थेत असताना या कंपनीला कंपनीमध्ये उत्पादन चालू करण्यास सी.ई.टी.पी. चे अध्यक्ष संभाजी पठारे यांनी ना हरकत प्रमाणपत्र कसे काय दिले व परवानगी कोणत्या आधारे दिली? असा सवाल करून औद्योगिक वसाहतीमधील अनेक कंपन्यांनी आपल्या कंपनीचे उत्पादन चालू करण्यासंदर्भात महाड सीईटीपीकडे अनेक दिवसांपासून अर्ज केले आहेत मात्र, त्यांच्या अर्जांना परवानगी देण्या अगोदर मागून आलेल्या कंपनीला कशी काय परवानगी दिली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीमधील 11 कामगारांच्या मृत्यूच्या जीवाची किंमत ठरवण्याचा अधिकार आमदार गोगावले व त्यांच्या पुत्राला आहे का? असा सवाल देखील ओझर्डे यांनी या वेळी उपस्थित करून समृद्धी महामार्गावरील घटना घडली तर मुख्यमंत्री लागलीच त्याठिकाणी दाखल होतात मात्र, ज्या दिवशी ब्लू जेट हेल्थ केअर कंपनीमधील घटना घडली त्याच दिवशी मुख्यमंत्री हे महाबळेश्वरमधील त्यांच्या दरे या गावी शेताची पाहणी करण्यासाठी गेले होते मात्र आमदार गोगावले हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असताना देखील ते या ठिकाणी उपस्थित का राहिले नाहीत किंवा त्यांनी का पाहणी केली नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तसेच मृतांच्या कुटुंबियांना मदत वाटपाचे धनादेश विकास गोगावले यांच्या हस्ते देण्यामागे विकास गोगावले हे कंपनीचे मालक आहेत की कंपनीचे भागीदार असा सवाल त्यांनी उपस्थित करून मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम विकास गोगावले यांनी केले आहे असा गंभीर आरोप करून एवढं घाणेरडे राजकारण विकास गोगावले करीत असून कंपन्यांमध्ये घातक रसायनांचे उत्पादन घेतले जात आहे, प्रत्येक क्षणात कागदावर एक उत्पादन घेतलेले दाखवायचे व प्रत्यक्षात कंपनीमध्ये दुसरेच उत्पादन घ्यायचे असा प्रकार औद्योगिक कंपन्यांमध्ये होत असून त्या कंपन्यांची नावे मी लवकरच जाहीर करणार आहे तसेच या कंपन्यांमधील 11 कामगारांच्या मृत कुटुंबीयांना समान निधीचे वाटप न झाल्यास मी कंपनी विरोधात न्यायालयात पिटीशन दाखल करीन असा इशारा सोमनाथ ओझर्डे यांनी दिला आहे.
