• Thu. Feb 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

बिबट्याची कातडी जप्त; अलिबाग वन विभागाची कारवाई

ByEditor

Nov 13, 2023

विनायक पाटील
पेण :
अलिबाग वनविभाग पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनअधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुंबई गोवा महामार्गावरील उंबर्डे फाट्याच्या दक्षिणेकडे वाशी नाका, पेण येथे असलेल्या म्हात्रे चाळीत वन्य प्राण्यांच्या कातडीची विक्री होणार होती. त्यानुसार वेगवेगळे पथक करून सायंकाळी 5 वाजता सापळा रचून आरोपीचा पाठलाग करत बिबट्याचे सुकलेले कातडे व एक मोटारसायकल जप्त केली. गुन्ह्य़ातील संशयित आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

सदरील कारवाई ही अलिबाग वन विभाग व WCCB, WR, नवी मुंबई यांनी संयुक्तरीत्या केली असून अलिबाग वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील (भा.व.से.) आणि WCCB चे उपसंचालक योगेश वरकड यांचे मार्गदर्शनाखाली व गायत्री पाटील सहाय्यक वनसंरक्षक अलिबाग यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून पेण वनक्षेत्रातील वनपाल, वनरक्षक व फिरते पथक अलिबाग कडील वनरक्षक व चालक आदी सापळा रचणे कामी उपस्थित होते.

वन्य प्राण्यांची शिकार करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. या गुन्ह्यात आरोपींना तीन ते सात वर्षाचा सक्षम कारावासाची शिक्षा होते. नागरिकांनी अंधश्रद्धा व अमिषांना बळी पडू नये. वन्य प्राण्यांच्या तस्करी करणाऱ्यांची माहिती वन विभागाकडे द्यावी. संबंधित व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाईल. वन्य प्राणी तस्करीसह त्याची कातडी विक्री प्रकरणी वन विभागाकडून सखोल तपास केला जात आहे.

श्रीम. गायत्री पाटील
सहाय्यक वनसंरक्षक अलिबाग

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!