• Thu. Feb 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ऐन दिवाळीत अवकाळीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला, शासनाकडून सरसकट पंचनाम्याची मागणी

ByEditor

Nov 13, 2023

कर्जत
गणेश पवार :
ऐन दिवाळीचा सण सुरू असताना अवकाळी पावसाने कर्जत तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. गेले तीन दिवस सायंकाळी मुसळधार कोसळलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. शेतात केलेले भाजीपाल्याचे मळे कोलमडून पडले आहेत. तर कापणी करून शेतात ठेवलेले भातपीक शेतातच भिजून त्याला आता कोंब येऊ लागले आहेत. तेव्हा शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी बाबत शासाने सरसकट पंचनामे करावेत अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

भाताचे कोठार अशी कर्जत तालुक्याची ओळख होती. मात्र लहरी निसर्ग, विभक्त कुटुंब, मजुरांची कमतरता, आणि भाताला मिळणारा कवडीमोल भाव यामुळे खर्च जास्त उत्पन्न कमी अशी अवस्था भातशेतीची आहे. त्यामुळे भातशेतीचे क्षेत्र तालुक्यातून कमी होत गेले. मात्र आजही बहुतांश शेतकरी हे आपली पारंपरिक भातशेती सांभाळून आहेत. तर यासोबत भाजीपाला पिकवण्याचे प्रमाण देखील कर्जत तालुक्यात अधिक आहे. मात्र एन दसरा दिवाळीच्या तोंडावर येणाऱ्या अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो अशी अवस्था शेतकऱ्यांची आहे. यंदा उशिरा आलेल्या पावसाने दमदार बॅटिंग करत लवकरच दडी मारली. मात्र गेले ५ दिवस रायगड जिल्ह्यात ढगाळ वातावरण सुरु झाले होते. अशात बुधवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार कर्जत तालुक्यातील कर्जत, नेरळ भागात काही वेळ वादळी पाऊस झाला. तर गेले तीन दिवस सायंकाळी अवकाळी पावसाने धुमशान माजवले आहे.

कर्जत तालुक्यात मागील तीन दिवस कोसळलेल्या पावसामुळे कारले, काकडी, भोपळा, घोसाळी, शिराळे आदी भाजीपाल्याच्या वेलींसाठी काठीचा आधार देत उभे केलेले मळे वादळी वाऱ्यामुळे कोसळून पडले आहेत. तर भात कापणी करून शेतकऱ्यांनी शेतात ठेवले असताना पावसाचे पाणी शेतात साठून भातपीक पूर्ण भिजून त्याला आता कोंब येऊ लागले आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. भाजीपाल्याचे मळे कोसळल्याने आता गुजराण करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर येऊन ठेपला आहे.

मी ग्रामीण भागातील शेतकरी असून शेतीवरच माझ्या कुटुंबाचा आर्थिक गाडा चालतो. भाजीपाल्याचे मळे केले होते. त्यावर आता फळे लागवड होत असतानाच अवकाळी पावसाने मळे कोलमडून पडले आहेत. त्यामुळे आता केलेली मेहनत आणि खर्च वाया गेला असून उत्पन्न देखील मिळणार नाही. या अस्मानी संकटाने शेतकऱ्यांनी शेती करायची कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

-अरुण वेहले,
शेतकरी

गेल्या दोन तीन दिवसांपासून तालुक्यात अवकाळी पाऊस होऊन कर्जत तालुक्यातील भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर हाता तोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. पिकवीम्याचे पंचनामे झाले नाही तर पैसे मिळणार नाहीत . त्यामुळे भारतीय जनता पार्टी किसान मोर्च्याच्या वतीने तहसीलदार कर्जत यांचे कडे निवेदनाद्वारे त्वरित पंचनामे करण्याची मागणी आम्ही केली आहे. त्यावर कर्जत तहसीलदार डॉ.शीतल रसाळ यांनी कृषि विभाग तलाठी आणि विमा कंपन्याना त्वरित पंचनामे करण्याचे आदेश देऊन योग्यती नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे.

-सुनील गोगटे,
उपाध्यक्ष, भाजप किसान मोर्चा

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!