• Thu. Feb 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जिल्हा प्रशासनाच्या वरदहस्ताने रायगड जिल्ह्यात डिझेल तस्कर पुन्हा सक्रिय!

ByEditor

Nov 15, 2023

रेवदंडा पोलीस स्टेशन हद्दीतील कुंडलिका खाडी बनले डिझेल उतरविण्याचे नवीन ठिकाण

अमूलकुमार जैन
अलिबाग :
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुका हा मुंबई पासून समुद्रमार्गे अगदी जवळचा तालुका असल्याने परत एकदा जिल्हा प्रशासनाच्या वरदहस्ताने डिझेल तस्कर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत.रायगड जिल्ह्यात डिझल तस्करी परत एकदा फोफावू लागल्याचे समोर येत आहे. डिझेल तस्कर यांनी रेवस गावातील जेट्टीवर डिझेल उतरविण्याचे बंद करून आता नवीन ठिकाण रेवदंडा पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडलिका खाडीच्या तीरावर केले आहे. काही महिन्यांपूर्वी डिझेल तस्करांबाबत रेवदंडा समुद्रकिनारी गणेश कोळी नामक व्यक्तीच्या बोटीवर खोपोली पोलिसांनी कारवाई केली होती. यातील गणेश कोळी आणि इतर तीन कुख्यात डिझेल तस्कर हे गोल्डन रंगाची इर्टिगा आणि गणेश कोळी यांच्या गाडीतून येवून काही दिवसापूर्वी पोलिस अधीक्षक कार्यालयातील एका अधिकारी यांची त्यांच्या कक्षात भेट घेतली होती. यामध्ये डिझेल तस्कर आणि अधिकारी वर्ग यांच्यामध्ये मध्यस्थी करणारा व्यक्ती हा दुसरा तिसरा कोणी नसून तो नवी मुंबई येथील शासकीय सेवेतून निलंबित केलेला अधिकारी आहे.

डिझेल तस्कर हे समुद्रातील बोटीमधून तेलाची चोरी करण्याआधी भारतीय तसेच परदेशी मालवाहतूक जहाजाच्या कॅप्टन बरोबर हातमिळवणी करून हजारो लिटर डिझेल विकत घेऊन ते डिझेल रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि उरण तालुक्यातील समुद्रकिनारपट्टीवर असणाऱ्या जहाज मालक यांना तीस ते पस्तीस टक्के कमी दरात विक्री करीत आहेत. या विक्रीतून डिझेल तस्करी करणारे हे आठवड्याला जवळपास पाच ते सहा कोटी रुपये कमवत आहेत. डिझेल तस्करी करीत असताना स्थानिक प्रशासनाच्या वरदहस्त असल्याने सुरू आहे.

समुद्र किनाऱ्यापासून काही नॉटिकल अंतरावर असलेल्या समुद्रात मोठमोठ्या जहाजातील डिझेल काढून कमी दरात मच्छीमारांना विकणारे मोठे रॅकेट रायगडच्या किनारपट्टीवर कार्यरत असल्याचे काही महिन्यांपासून निदर्शनास येत आहे. जहाज मालकांनी तक्रार केल्यावर तात्पुरत्या स्वरूपात लुटमारीवर कारवाई केली जाते. यासाठी नोंदणी न केलेल्या बोटी वापरल्या जात असल्याने सागरी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!