किरण लाड
नागोठणे : रायगड जिल्ह्यातील मोठी तसेच नावाजलेल्या नागोठणे ग्रामपंचायतीची निवडणूक 5 नोव्हेंबरला पार पाडली. निवडणूकीत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), काॅग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट व शेतकरी कामगार पक्ष यांच्या जनसेवा विकास आघाडीचा सरपंच तसेच 15 उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून आले तर एक उमेदवार अगोदरच बिनविरोध निवडून आलेला असल्याने 17 सदस्यांच्या नागोठणे ग्रामपंचायतीमध्ये फक्त 1 उमदेवार राष्ट्रवादी शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या परिवर्तन पॅनलचा निवडून आल्याने नागोठणे ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये परिवर्तन पॅनलला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मतदारांमधून थेट सरपंचपद पदासाठी जनसेवा आघाडीच्या उमेदवार सुप्रिया महाडीक मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याने त्यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदासाठी निवडणूकीचा कार्यक्रम शुक्रवार, दि. 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता कै. शैलेंद्र देशपांडे सभागृहात घेण्यात येणार आहे.
तसे पाहता जनविकास आघाडीने नागोठणे ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता प्रस्थापित केल्याने उपसरपंच पदासाठी निवडणूक एक औपचारिकता ठरणार आहे. नागोठणे ग्रामपंचायत उपसरपंच पदाच्या निवडीसाठी 17 नोव्हेंबरला सकाळी 10 ते 11 या वेळेत फॅार्म मिळणार असून, फाॅर्म स्विकारण्याची वेळ, छाननीची वेळ, फाॅर्म मागे घेण्याची वेळ या निवडणूका प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी दुपारी 2 वाजता उपसरपंचाची निवड होणार आहे. नागोठणे ग्रामपंचायतीवर जनविकास आघाडीने एकहाती सत्ता मिळवली असल्याने नेत्यांबरोबर सर्व कार्यकर्ते खुशीत आहेत. दिवाळीचा सण सगळीकडे जोरात चालू असताना खरे फटाके उद्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर फुटणार आहेत. हे खरे असले तरी उद्या उपसरपंच कोण होणार याची उत्सुकता नागोठण्यातील जनतेला लागलेली आहे.
