मिलिंद माने
महाड : मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरे करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा दिनांक १९ नोव्हेंबर रोजी महाड मधील छ. शिवाजी महाराज चौक येथे होणार आहे. या जाहीर सभेला राज्यातील सत्ताधारी महायुतीतील नेत्यांचा अप्रत्यक्ष विरोध असल्याचे सकल मराठा समाज महाड तालुका समाजाच्या मीटिंगमध्ये दिसून आले. सत्ताधारी महायुतीतील नेत्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याने १९ नोव्हेंबरच्या सभेला होणाऱ्या गर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरे चालू केलेल्या मनोज जरांगे – पाटील यांची कोकणातील जाहीर सभा १९ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता महाड मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आयोजित केली आहे. या सभेच्या नियोजनासाठी सकल मराठा समाज महाड तालुक्यातर्फे महाड मधील वीरेश्वर देवस्थान मंदिरामध्ये बैठकीचे आयोजन केले होते. आयोजित केलेल्या या बैठकीकडे महाड तालुक्यातील सत्ताधारी महायुतीतील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी पाठ फिरवल्याने या सभेमध्ये याबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात होते.
महाड मधील वीरेश्वर देवस्थान या मंदिरामध्ये महाड तालुक्यातील सकल मराठा समाजाची बैठक सकाळी ११ वाजता आयोजित केली होती. या बैठकीसाठी सकल मराठा समाजाचे तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. मात्र सत्ताधारी महायुतीमधील भाजपा, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी पवार गट यांचे पदाधिकारी मात्र जाणीवपूर्वक गैरहजर असल्याची चर्चा यानिमित्त आयोजित केलेल्या बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांमध्ये ऐकण्यास मिळाली. सकल मराठा समाज महाडतर्फे आयोजित केलेल्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुभाष निकम, सुभाष मोरे, चैतन्य म्हामुणकर, राजेंद्र कोरपे, संदीप सकपाळ, निलेश धुमाळ, विनोद देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. महाड तालुका सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या बैठकीमध्ये महाड तालुक्यातून व नगरपरिषदेमधून तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून गेलेल्या मराठा समाजाच्या महायुतीमधील माजी पदाधिकाऱ्यांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवल्याने त्यांना मराठा समाजाबद्दल व मराठा समाजाला आरक्षण मिळावे याबाबत त्यांची नेमकी भूमिका काय आहे याबाबत बैठक संपल्यानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. तसेच मराठा समाजाला आरक्षणाबाबत या लोकप्रतिनिधींची उदासीनता असल्याचे दिसून आले.
