किरण लाड
नागोठणे : कायदा, सुव्यवस्थेचा धाक नसला किंवा त्याची तीव्रता कमी झाली कि, काय घडू शकते याचा अनुभव आपल्याला वेळोवेळी बघायला मिळत असतो. एल अँड टी कन्स्ट्रक्शन बेणसे, झोतीरपाडा येथून चोरट्यांनी दहा टनाची अंदाजे 11 लाख किंमतीची काॅपरयुक्त केबल चोरुन नेली आहे. सदर चोरीचा गुन्हा नागोठणे पोलीस स्टेशन हद्दीतील बेणसे, झोतिरपाडा, ता. पेण येथे घडला आहे.
चोरीची घटना 4 आॅक्टोबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत घडली आहे. चोरट्यांनी साधारण 10 टनाची काॅपरयुक्त केबल लंपास केली असून त्याची किंमत अंदाजे 11 लाख एवढी आहे. एल अँड टी कन्स्ट्रक्शनचे बेणसे, झोतीरपाडा येथे काम सुरु असून तेथील मोकळ्या जागेतून ही काॅपर केबल चोरट्यांनी लंपास केली आहे. याची तक्रार सुजित गरड (वय 50 रा. नागोठणे, मुळ गाव नांदगाव, जि. बिड) यांनी नागोठणे पोलीस स्टेशनला दि. 22 नोव्हेंबर रोजी दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास नागोठणे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण व पोलीस हवालदार सानप करीत आहेत.
