अनंत नारंगीकर
उरण : धुतूम ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात आलेल्या इंडियन ऑईल अदानी व्हेंचर लि. प्रकल्पात धुतूम गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कामावर सामावून घेण्यात यावे या मागणीसाठी धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांनी आपल्या नेतृत्वाखाली सोमवार (दि. २०) पासून बेमुदत आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. या उपोषणाचा आज ४ था दिवस असून आपल्या गावकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी निस्वार्थीपणे आमरण उपोषणाच हत्यार एक महिला सरपंच म्हणून हाती घेतले आहे.अशा धुतूम गावच्या सरपंचांचा निश्चित अभिमान वाटत आहे.असे प्रतिपादन शेकापचे उरण तालुका युवा अध्यक्ष रमाकांत म्हात्रे यांनी व्यक्त केले.
इंडियन ऑइल सध्याची इंडियन ऑईल अदानी व्हेंचर लि.या प्रकल्पात धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना व गावातील बेरोजगार तरुणांना कायमस्वरूपी कामावर सामावून घेण्यात यावे या आपल्या मागणीसाठी धुतूम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर, उपसरपंच कविता कुंदन पाटील तसेच प्रकल्प बाधित २३ शेतकरी यांनी सोमवार ( दि. २०) पासून आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. जवळ जवळ संपुर्ण धुतूम गावातील सर्वपक्षीय मंडळी या आंदोलनात सहभागी झाली असताना काही धुतूम गावातील लोकप्रतिनिधी हे स्वतःच्या स्वार्थापोटी या आमरण उपोषणाला आपला पाठिंबा न दर्शविता प्रकल्पाची बाजू घेण्याचा प्रयत्न करत असतील तर ते योग्य नाही. तरी अशा संधीसाधू गावातील लोकप्रतिनिधी पासून सावध राहणे गरजेचे आहे असे रमाकांत म्हात्रे यांनी नमूद केले.
धुतूम ग्रामस्थांच्या या आंदोलनाच्या मागे उरण तालुका शेतकरी कामगार पक्ष खंबीर उभा राहणार असून धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर,उपसरपंच सौ कविता कुंदन पाटील तसेच उपोषणाला बसले ग्रामपंचायत सदस्य यांच्या सारखे लोकप्रतिनिधी प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत निवडून आले तर गावाचा उदार होऊन एक आदर्शवत राजकारणी विरहित गाव उद्यास आल्या शिवाय राहणार नाही असा विश्वास रमाकांत म्हात्रे यांनी व्यक्त करत प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा अंत पाहू नका असा इशारा प्रकल्प व्यवस्थापनाला दिला आहे. यावेळी रायगड जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनिष पाटील, सामाजिक कार्यकर्ते संजय ठाकूर यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ हे आपला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
