• Thu. Feb 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

दिघीच्या महिलांची दिघी पोर्टला धडक!

ByEditor

Nov 24, 2023

• मच्छीमार्केटसाठी दिघी पोर्टवर मोर्चा
• मोर्चात शेकडो महिलांचा सहभाग, बैठकीनंतर प्रश्न अधांतरीच

गणेश प्रभाळे
दिघी :
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथील मासे विक्री करणाऱ्या महिलांना व्यवसाय करण्यास मच्छीमार्केटची सुविधा नाही. सातत्याने मागणी होत असताना रस्त्यावर विक्री करत जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे. या महिलांच्या हाकेला कुणीच प्रतिसाद देत नसल्याने अखेर गुरुवारी 23 रोजी दिघी पोर्टला मोर्चा धडकला.

दिघी किनारपट्टीवर मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असला तरी सुविधायुक्त मासे विक्री मार्केटची मात्र, कमी आहे. येथील ‘आई एकवीरा ओली सुकी मच्छी विक्रेता’ ही महिलांची सामाजिक संस्था असून, या संस्थेतील दोनशेहून अधिक महिलांचा मासेमारी प्रमुख व्यवसाय आहे. या व्यवसायावर आपला कुटुंब चालविणाऱ्या महिलांना मासे विकण्यासाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे सातत्याने मागणी करण्यात येत आहे.

दिघी येथे औद्योगिक क्षेत्र तसेच पर्यटन स्थळ म्हणून वाढता आवाका आहे. याठिकाणी सुसज्ज मच्छीमार्केटची सुविधा मिळावी यासाठी स्थानिक संस्थेच्या हद्दीतील मेरिटाईम बोर्ड, दिघी पोर्ट, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या परवानगीने जागा उपलब्ध होण्यासाठी कागदोपत्री पूर्तता करण्यात आली असून, दिघी पोर्ट सी आर झेड ची परवानगी नसल्याचे कारण पुढे करत दुर्लक्ष करत असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

बंदर प्रशासन म्हणते-

दिघी कोळी बांधवांच्या मोर्चानंतर समन्वयाची बैठक घेण्यात आली. यामध्ये दिघी पोर्टचे अधिकारी उपस्थित राहून चर्चा करण्यात आली. सी आर झेड परवानगी शिवाय समुद्रकिनारी बांधकाम करण्यात येणार नाही. पर्यायी जागा सुचविल्यास निर्णय घेता येईल. सदर मागणीनुसार वरिष्ठांना कळविण्यात येईल. असे दिघी बंदरच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दिघी ग्रामपंचायत समोरील सुचवलेल्या जागेत मासेविक्रिसाठी मार्केट झाले पाहिजे. तशी आमची मागणी ठाम आहे. संपूर्ण दिघी पोर्ट समुद्रात उभे असून, सी आर झेड ची परवानगी फक्त आम्हा सर्वसामान्यांना करता केली आहे का?

-किरण कांदेकर,
दिघी कोळी समाज अध्यक्ष.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!