• Mon. Jul 28th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

खारभूमी सर्वेक्षण विभागाच्या दुर्लक्षित पणामुळे हजारो एकर शेतजमीन नापीक

ByEditor

Dec 1, 2023

बांधबंदिस्तीची कामे मार्गी लावण्याची मनसेची मागणी

अनंत नारंगीकर
उरण :
तालुक्यातील खोपटा, आवरे, पिरकोण, विंधणे, मोठी जुई ग्रामपंचायत हद्दीतील खाडी किनाऱ्यावरील बांधबंदिस्तीच्या कामांकडे खारभूमी सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने सदर शेतजमीनीत समुद्राच्या उधाणाचे पाणी शिरल्याने शेतजमीन नापीक झाली आहे. तरी खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग पेण येथील अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर सदर ग्रामपंचायत हद्दीतील बांधबंदिस्तीची कामे मार्गी लावावीत अशी मागणी मनसेचे उरण तालुकाध्यक्ष ॲड. सत्यवान भगत यांनी केली आहे.

खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग पेणचे वरिष्ठ कार्यकारी अभियंता विजय पाटील यांच्या दालनात गुरुवारी ( दि. ३०) भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून देताना अँड सत्यवान भगत यांनी सांगितले की उरण पुर्व विभागातील शेतकऱ्यांच उपजिविकेच साधन भात शेती आहे.परंतु गेली अनेक वर्षे खाडीकिनाऱ्या बांधबंदिस्तीची कामे न केल्याने तसेच करंजा बंदरात या अगोदर करण्यात आलेल्या दगड मातीच्या भरामुळे समुद्रातील उधाणाचे पाणी हे सातत्याने भात शेतीत शिरत आहे.एकंदरीत शेतकऱ्यांच उपजिविकेच साधन धोक्यात येत असताना, शासन पुन्हा एकदा करंजा बंदरातील १०० एकर जागेवर भराव टाकून मल्टिमाँडेल लॉजिस्टिक पार्क उभारण्याच्या तयारीत असून एमआयडीसी आणि मेरिटाईम बोर्डाने त्यासाठी जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे खोपटा, आवरे, पिरकोण, विंधणे, मोठी जुई ग्रामपंचायत हद्दीतील उरल्यासुरल्या भात शेतीत उधाणाचे पाणी शिरुन खारफुटीचे जंगल वाढण्याचा तसेच भातशेती नापीक होण्याचा संभव आहे. तरी आपण लवकरात लवकर सदर बांधबंदिस्तीची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी मनसेच्यावतीने ॲड. सत्यवान भगत यांनी याप्रसंगी केली. यावेळी खारभूमीचे उप अभियंता अतिश भोईर, पिरकोन ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य तथा मनसेचे उपतालुका अध्यक्ष दीपक पाटील उपस्थित होते.

उरण तालुक्यात काही अंशी बांध दुरुस्तीची कामे सुरू आहेत.तसेच खोपटा परिसरातील खाडीकिनाऱ्या वरील बांधबंदिस्तीची कामे मार्गी लावण्यासाठी राज्य व केंद्र शासन स्तरावर सतत प्रयत्न केले जात आहेत.परंतु निधी उपलब्ध झाल्यावरच टेंडर प्रक्रिया पार पडणार आहे.

-विजय पाटील
कार्यकारी अभियंता, खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग पेण

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!