युवा नेते भाई मंगेश दळवी यांच्या हस्ते गौरव
विनायक पाटील
पेण : तालुक्यातील स्वराज्य प्रतिष्ठान पेण पूर्व विभाग यांच्या वतीने दिवाळी सणानिमित्त आयोजित केलेल्या किल्ले प्रतिकृती स्पर्धेत पूर्वी विनोद बामुगडे प्रथम क्रमांक तर देवआळी धावटे द्वितीय क्रमांक आणि ऋग्वेद वासुदेव जेथे हा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आंबेघर येथील गावदेवी भवानी मातेच्या मंदिरात संपन्न झाला. यावेळी प्रथम वाकेश्वर महिला हरिपाठ मंडळ वाकरुळ यांचा सुश्राव्य असा हरिपाठ आयोजित केला होता. या हरिपाठाने वातावरण हरीनामात रंगून गेले होते. सदर स्पर्धा पेण पूर्व विभाग मर्यादित होती यामध्ये अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास लहान मुलांना समजला पाहिजे आणि त्यांची कला टिकली पाहिजे यासाठी दरवर्षी अश्या स्पर्धेचे आयोजन केले जाते.
यावर्षी कुरमुरली येथील पूर्वी विनोद बामुगडे हिने रायगड किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती तयार केली होती. तर धावटे गावातील देवआळीतील तरुणांनी शानदार राजगड किल्ला बनविला होता तर कामार्ली येथील ऋग्वेद वासुदेव जेधे याने पाण्यातील जंजिरा किल्ला बनविला होता. या सर्व विजेत्यांना युवा नेते भाई मंगेश दळवी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना, या विभागात ज्यांनी ज्यांनी किल्ले बनविले त्या सर्वांचे मनापासून कौतुक करतो आणि समाजात इतिहासाची जाणीव करून देणारे मंडळी आहेत त्यांचे देखील आभार मानतो असे युवा नेते भाई मंगेश दळवी यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले. यावेळी युवानेते भाई मंगेश दळवी, आंबेघर ग्रामपंचायत सरपंच सरिता गोपाल वाघमारे, हभप दत्तात्रेय महाराज ढेणे, युवा कार्यकर्ते प्रमोद लंबाडे, ग्रामस्थ चंद्रकांत पाटील, सुधीर गुडेकर, नागू टेंबे, बाळू धारवे, सुदाम पाटील, प्रदिप पाटील, एकनाथ राणे आदी ग्रामस्थ तसेच महिला आणि स्वराज्य प्रतिष्ठानचे सर्व सल्लागार आणि सदस्य यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल एरणकर यांनी केले तर या स्पर्धेला उपसरपंच सोनाली स्वप्नील बडे आणि साईभक्त दिनेश खामकर यांचे विशेष सहकार्य लाभले.