• Mon. Jul 28th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पर्यावरण विषयक जनसुनावणी बेकायदेशीर असून ती रद्द करावी – दशरथ भगत

ByEditor

Dec 1, 2023

घन:श्याम कडू
उरण :
देशात उरण प्रदूषणात नंबर एक असतानाही याकडे दुर्लक्ष करीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरण विषयक जाहीर जनसुनावणी आयोजित केली आहे, ती पूर्णपणे नियमाला धरून नसून बेकायदेशीर असून ती रद्द करण्याची मागणी नवी मुबंई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी केली आहे. यावर उपस्थित अधिकारी वर्गाकडून कोणतीच प्रतिक्रिया आली नसल्याने ही जनसुनावणी गुपचूप घेऊन पुढील सोपस्कार करण्यासाठीच या जनसुनावणीचे आयोजन केले असल्याची संतप्त प्रतिक्रिया उपस्थितांकडून व्यक्त होत होत्या.

६८० मीटर बर्थ लांबीसाठी क्रेन रेल स्पॅन २०.० मीटर पर्यंत वाढविणे, धक्याच्या डेकची रुंदी जमिनीच्या बाजूला १५.० मीटरने वाढविणे, विद्यमान ५३०.० मीटर बर्थ आणि १५०.० मीटर घाटाचे सुधारणा व मजबुतीकरण या संदर्भात पर्यावरण विषय मंजुरीसाठी जनसुनावणीचे आयोजन जेएनपीटी टाऊनशिप येथील बहुउद्देशीय सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी नवी मुबंई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी कोणताही प्रकल्प आणत असताना त्यापासून काय होऊ शकतो याची चाचपणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर जनसुनावणी ठेवताना जनजागृती करण्यासाठी या परिसरातील सर्व बाधीत ग्रामपंचायतना लेखी कळविणे कायद्याने आवश्यक आहे. मात्र कोणतीही जनजागृती न करता एक दोन वृत्तपत्रात जाहिरात देऊन आपला आर्थिकदृष्ट्या स्वार्थ साधण्यासाठी शासकीय यंत्रणेने आयोजित केलेली जनसुनावणी ही नियमाला धरून नसल्याने ती रद्द करण्याची मागणी लावून धरली आहे. यासाठी ते पाठपुरावा करणार असल्याचे समजते.

वाढत्या औद्योगिक विकासामुळे उरणचा पर्यावरण समतोल पूर्णपणे ढासळला आहे. आजच्या घडीला आपल्या देशात सर्वाधिक प्रदूषण उरणला असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते. याचा कोणताही सारासार विचार न करता उरण परिसरात अनेक प्रकल्प नव्याने येत आहेत. त्यातील बहुतांश प्रकल्प हे समुद्रात भराव करून उभारले जात आहेत. यामुळे शेतकरी व पारंपारिक मच्छीमार बांधवही ही देशोधडीला लागत आहेत. शेतकऱ्यांची जमीन गेली तर मासेमारी करणाऱ्या खाड्याच नष्ट केल्याने बेसुमार मिळणारी किल्शी, खुबे, बोईट, निवठी या मासळी दिसेनाहीशा झाल्या आहेत. यावरून उरणमध्ये पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला असल्याचे उघड होत आहे. यामुळे येथील स्थानिकांना नोकरीत ही प्राधान्य मिळत नसल्याने त्यांच्यावर भविष्यात उपासमारीचे संकट येण्याची लक्षणे दिसत आहे.

आजपर्यंत अनेक जनसुनावणी झाल्या आहेत. परंतु त्याची जनजागृती न करता अचानकपणे घेऊन शासकीय यंत्रणा प्रकल्पास मंजुरी देऊन मोकळे होतात. आजची जनसुनावणी ही कोणतीही जनजागृती न करता वर्तमानपत्रात जाहिरात देऊन आपला स्वार्थ साधण्याचा प्रदूषण मंडळाचा प्रयत्न होता. त्यामुळेच ही सुनावणी रद्द करण्याची मागणी भगत यांनी केली. यावेळी माजी ट्रस्टी भूषण पाटील, नवीन शेवा गावचे कमळाकर पाटील, हनुमान कोळीवाडा व पाणजे ग्रामस्थ, मनोज कोळी यांनी आपल्या समस्यां मांडून बाधीत शेतकरी व मच्छीमार बांधव यांना नोकरीत सामावून घेण्याची मागणी केली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!