माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील घटना
सलीम शेख
माणगाव : कोकण रेल्वेखाली उडी घेऊन माय-लेकींसह तिघींनी आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलीसांनी वर्तविला आहे. सदरची घटना शुक्रवार, दि. १ डिसेंबर २०२३ रोजी पहाटे ३:१० वाजण्याच्या सुमारास माणगाव तालुक्यातील गोरेगाव लोणेरे रस्त्यावरील रेल्वे पुलावर इलेक्ट्रिक पोल क्र. ४१/२३ ते ४१/२७ च्या दरम्यान घडली. या घटनेची खबर नरेश सुभाष गायकवाड (वय -३९ मूळ रा. गीरडा जि. बुलढाणा, सध्या रा. वरसगाव कोलाड ता. रोहा) यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात दिली. या घटनेने गोरेगाव विभागासह संपूर्ण माणगाव तालुक्यात खळबळ उडाली असून या माय-लेकींच्या आत्महत्येचे खरे कारण मात्र समजू शकले नाही.
सदर घटनेबाबत गोरेगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील मयत रिना जयमोहन नायर (वय -३६) यांच्या दोन मुली जिया जयमोहन नायर (वय-१५) आणि लक्ष्मी जयमोहन नायर (वय -१२) यांना कोकण कन्या एक्स्प्रेस रेल्वे क्र. २०११२ या रेल्वे गाडीची ठोकर लागून त्यात या माय-लेकींना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. माय-लेकींनी आत्महत्या केली असावी असा प्रथम दर्शनी अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या घटनेची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, कौटुंबिक कलहामुळे या महिलेने दोन मुलींसह आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. रिना हिचा पती केरळमध्ये असल्याने तो आल्यानंतरच खरे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. सदर घटनेचा अधिक तपास अतिरिक्त कार्यभार असलेले माणगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार खंदारे हे करीत आहेत.