वन्य प्राणी, पक्षी जीव वाचवण्यासाठी सैरभैर
अनंत नारंगीकर
उरण : तालुक्यातील वनसंपदाच्या रक्षणाकडे वन विभागाच्या अधिकारी, कर्मचारी वर्गाने दुर्लक्ष केल्याने आज तालुक्यातील माती, दगड माफियांनी जोरदार डोंगर, माळरान परिसर पोखरण्यास सुरूवात केली आहे. माती काढणे सोयीस्कर व्हावे यासाठी वृक्षवल्लीने भरलेल्या जंगलांना आग लावण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी (दि. १) कडापे-वशेणी परिसरातील जंगलात वणवा लावण्यात आला होता. मात्र प्राणीमित्र आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर मेहनत घेऊन हा वणवा विझवला.

उरण तालुक्यात औद्योगिकरण झपाट्याने वाढत आहे. अशा वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि वन विभागाच्या दुर्लक्षामुळे येथील दगड खाण व्यवसायिकांचा आणि माती उत्खनन करणाऱ्या व्यवसायिकांचा धंदा तेजीत आला आहे. अशा दगड खाण व्यवसायामूळे आणि माती उत्खननामूळे या तालुक्यात पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात सूरू आहे. त्यात काही दगड माती उत्खनन करणाऱ्या व्यवसायिकांनी वन आणि महसूल अधिकारी यांना हाताशी धरून डोंगर, माळरान परिसराला आगी लागण्यास सुरुवात केल्याने येथील जंगलातील प्राण्यांच्या, पशुपक्ष्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
उरण तालुक्यातील विंधणे, चिरनेर, रानसई, मोठी जुई, कोप्रोली, पुनाडे, वेश्वी, वशेणी, चिर्ले, जासई ग्रामपंचायत हद्दीतील डोंगराना आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच डोंगर परिसरात वावरणाऱ्या प्राण्यांच्या, पशुपक्ष्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या आगीचा (वणव्याचा) धसका घेतलेले प्राणी आपला जीव वाचवण्यासाठी आणि अन्नपाणी शोधण्यासाठी सैरभैर झाले आहेत. तर माकडे ही गावात घरादारावर उड्या मारताना पाहावयास मिळत आहेत.
शुक्रवारी (दि. १) कडापे-वशेणी येथील डोंगरात अज्ञात समाजकंटकानी वणवा लावला होता. या वणव्याची माहिती मिळताच वणवा विझवण्याचे काम फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) चिरनेर उरण-रायगडच्या राकेश शिंदे व हृषिकेश म्हात्रे यांनी केले. सोबत वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी ह्यांनी देखील अथक परिश्रम घेऊन वणवा विझवण्यास मदत केली. वणव्यामुळे मोठ्या प्रमाणात जंगलांचा नाश होत असून अनेक पक्षी त्यांची घरटी, अंडी, लहान जीव, कीटक, सरपटणारे प्राणी नष्ट होऊन पर्यावरणाला धोका पोहचत असल्याने ग्रामस्थांनी जंगलात वणवा लागू नये म्हणून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) चिरनेर उरण-रायगड तर्फे ग्रामस्थांना करण्यात आले आहे.