घन:श्याम कडू
उरण : आयुष्याच्या शेवटापर्यंत पत्रकार क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असणारे उरणकरांचे अण्णा उर्फ गोपीनाथ रामचंद्र चव्हाण यांचे दि. १ डिसेंबर २०२३ रोजी वयाच्या ९३व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने वृत्तपत्र विक्रेत्यांचा आधारस्तंभ गेल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांसह समस्त उरणकरांवर दुःखाचे सवट पसरले आहे.
साष्टी पासून पनवेल तालुक्याला कधीकाळी जोडलेला उरण महाल, उरणपेटा आणि त्यानंतर स्वतंत्र झालेला उरण तालुका आणि दोन आमदारांच्या विळख्यातून उरणकरांचा स्वतंत्रपणे झालेल्या आमदारांपासून उरण तालुक्याचा भौगोलिक प्रवास व तालुक्याचा बदलत्या विकासाचे अण्णा हे साक्षीदार होते. त्याचप्रमाणे अण्णा हे पत्रकारितेच्या क्षेत्रातील दीपस्तंभ होते. अण्णांनी गेली ५० वर्षापेक्षा अधिक काळ पत्रकारिता क्षेत्रात काम केले. त्यामुळे अण्णांचे जीवन संघर्षानी भरलेले होते. निर्माण झालेल्या अनेक वादळांना अण्णांनी परिणामाची परवा न करता समर्थपणे तोंड देत बहुजन समाजाचे हित जपले, त्याच बरोबरीने महाराष्ट्र राज्यात वृत्तपत्र विक्रेत्यांवरील अन्याय दूर करणारा पत्रकार ही उरणकरांनी अण्णामध्ये पहिला आहे.
आज वयोमानाप्रमाणे त्यांचे लिखाण बंद असले तरी वैचारिकदृष्ट्या अण्णा सक्षम होते. 1984 सालचा उरणमधील दी. बा. पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शेतकरी लढ्यामधील अण्णा साक्षीदार होते. लढ्याची क्षणचित्रे अण्णांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली होती. पण दुर्देवाने एका पोलीस अधिकाऱ्याने अण्णांचा कॅमेरा हिसकावून घेऊन आतील फिल्म काढून घेतली. त्यामुळे आजची पिढी लढयाचा सचित्र इतिहास पाहू शकत नाही हे दुर्देव आहे. अण्णांचे कार्य अविरत सुरु होते. अण्णांनी संपूर्ण महाराष्ट्रातील वृत्तपत्र विक्रीत्यांची संघटना उभारून त्यांना त्यांचे न्याय हक्क मिळून देण्यात अण्णांचा सिंहाचा वाटा आहे. अण्णांनी वृत्तपत्राचे लेखन करता करता अध्यात्मिक लेखनावर सुद्धा भर दिला. “अध्यात्मिक”, ”यशोदामाता” अशी दर्जेदार पुस्तके अण्णांनी लिहिली आहेत. तर “ज्ञान आणि बोध” हे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे. अण्णांबाबत बरच काही लिहिण्यासारखे आहे, पण त्याला जागा अपुरी पडेल. आज अण्णा आपल्यात नाहीत, उरण कोटनाका येथील त्यांच्या निवासस्थानी १ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास वयाच्या ९३ व्या वर्षी उरणकरांचे आण्णा चक्रधर स्वामींच्या चरणी विलीन झाले आणि अखंड उरण दुःखाच्या महासागरात बुडून गेला.
