ट्रॉमा केअर सेंटरमुळे राजिपच्या पाच कार्यालयावर जागा शोधण्याची आली वेळ
सलीम शेख
माणगाव : गेली अनेक वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गा लगत माणगाव बाजारपेठेत असणाऱ्या पूर्वीच्या पंचायत समिती कार्यालयात रायगड जिल्हा परिषदची महत्वाची व जिव्हाळ्याची असणारी पाच कार्यालये गेली अनेक वर्षापासून कामकाज चालवीत आहेत. त्या कार्यालाची जागा उपजिल्हा रूग्णालयाकडे वर्ग करण्यात आली असून याठिकाणी लवकरच ट्रॉमा केअर सेंटर उभारले जाणार आहे. त्यामुळे राजिपच्या या कार्यालयांना दुसरीकडे स्थलांतरित करण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी तसेच राजिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लेखी पत्र देवून स्थलांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ही कार्यालये आता भाड्याच्या खोलीतून चालवली जाणार आहेत.
माणगाव येथे राजिपच्या पंचायत समिती हि गेली अनेक वर्ष चालू होती. माणगाव पंचायत समितीची स्वतंत्र इमारत गेली १६ वर्षापूर्वी माणगाव प्रशासकीय भवन लगत भव्य स्वरुपात शासनाने बांधली. त्याठिकाणी जि.प. च्या विविध विभागाचे काम सुरू आहे. मात्र राजिपच्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, एकात्मिक बालविकास सेवा योजना, विभाग आणि गट शिक्षण अधिकारी यांचेकडील गट साधन केंद्र सर्व शिक्षा अभियान कार्यालय, महिला बचत गट हिरकणी कार्यालय, या पाच कार्यालयाच्या विभागांना नवीन पंचायत समिती इमारतीत जागा नसल्याने हि पाच महत्वाची कार्यालये अद्याप पर्यत जुन्या पंचायत समिती इमारतीत सुरु होती. या इमारती लगत माणगाव उपजिल्हा रुग्णालय असल्याने या ठिकाणी शासनांनी ट्रॉमा केअर सेंटर एक वर्षांपूर्वी मंजूर केले होते. याठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर उभारले जाणार आहे. त्यामुळे या पाच कार्यालयांना पर्यायी व्यवस्था करण्याचे सांगितले आहे.
ट्रॉमा केअर सेंटरमुळे या पाच कार्यालये स्थलांतरित करण्यासाठी संबंधित विभागांना शासना कडून पत्र आल्याने त्यांच्यापुढे दुसरी जागा शोधण्याची वेळ आली आहे. या कार्यालयांना माणगाव तहसीलदार व माणगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी प्रयत्न करून बसण्याची व्यवस्था करावी असेही जिल्हाधिकारी यांनी लेखी पत्रान्वये कळविले आहे. मात्र हे पाच कार्यालये स्थलांतरित होणार असल्याने नागरिकांनाहि कार्यालये शोधताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.