वाढत्या औद्योगिकरणासह शहरीकरण व नागरीकीकरणाचा नदीला फटका
सलीम शेख
माणगाव : निसर्गनिर्मित हजारो वर्षाची साक्ष देणारी आणि शेकडो गावांची पिण्याच्या पाण्याची तहान भागवणारी काळनदी ही माणगावकरांचे काल, आज आणि उद्याचे वैभव आहे. ते वैभव जपण्यासाठी व पुढच्या पिढीला आरोग्यदृष्ट्या निरोगी ठेवण्यासाठी काळ नदी प्रदूषण मुक्त ठेवून माणगाव तालुका स्वच्छ ठेवणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. मात्र, नागरिक या नदीकडे गांभीर्याने पाहण्याऐवजी अक्षम्य दुर्लक्ष करित आहेत. कुंभे ते गोरेगाव दरम्यानचे काळनदीचे अंतर सुमारे ७५ किमी असून या नदीचा उगम कुंभे येथे झाला तर समारोप गोरेगाव येथे झाला. तर दुसरी नदी भिरा येथील देवकुंड धबधब्यातून तीचा उगम होतो. ती रवाळजे धरणातून पुढे रोहा बाजूकडे कुंडलिका नदीचा प्रवास सुरु होतो. ही नदी मानवनिर्मित चुकांमुळे विविध कारणांनी दुषित होत आहे. याचा फटका सर्वांनाच बसत आहे. वाढते औद्योगिकरण, शहरीकरण व नागरीकीकरण याचा या नदीला याचा मोठा फटका बसत आहे.
माणगावची काळ नदी ही सह्याद्रीच्या कुशीतील कुंभे या गावातील जंगलातून स्वच्छ व जिवंत पाण्याचे झरे देत पुढे वाट काढीत अनेक गावातून ती शेकडो किलोमीटर अंतर पार करीत गोरेगावाजवळ खाडीच्या पाण्याला जावून मिळते. तिथे तिचा प्रवास संपतो. या अंतरात असणाऱ्या अनेक गावांची तहान भगवते. त्यामुळे अनेक गावांच्या जलवाहिन्या नळपाणी पुरवठा योजना या नदीवर कार्यान्वित आहेत. त्यामुळे या नदीचा विस्तार पाहता या नदीचा उपयोग नागरिकांना मोठ्या प्रमाणात झाला आहे. पाणी हेच जीवन असून निसर्गाने दिलेली ही देणगी मानवाने दुषित करण्याचे काम चालवले आहे. मराठवाड्यासह राज्यात अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भाक्ष असतांना कोकणामध्ये पाण्याला सुकाळ आहे. मात्र हे निसर्गनिर्मित पाणी अनेक ठिकाणी दुषित होऊन नागरिकांचे आरोग्य दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. याकडे गांभीर्याने ना सरकार पाहत ना लोकप्रतिनिधी पाहत याचा फटका मात्र सर्व नागरिकांना बसत आहे. नागरिक या काळ नदीला आपली म्हणण्यापेक्षा माझी नदी असे कधी म्हणणार? तेव्हाच हा दुषित पाण्याचा प्रश्न कांही अंशी निकाली निघेल अशी आशा वाटते. अखेर नागरिकांच्या चुकांमुळे काळ आणि कुंडलिका नदी दिवसेंदिवस दुषित होत आहे.
निजामपूर भागात दिली मुंबई कॉरीडॉर तसेच नव्याने येऊ घातलेल्या औद्योगिक प्रकल्पामुळे त्याच बरोबर गेल्या कांही दिवसापासून विळे भागाड औद्योगिक प्रकल्प सुरु झाल्याने या नदीवर वाढत्या औद्योगिकीकरणाचे आक्रमण होऊन पुरती संकटात सापडली आहे. त्याच बरोबर या नदी काठावर असणाऱ्या अनेक गावांमुळे ती प्रदूषित होऊ लागली आहे. विविध गावातील वाढते नागरीकीकरण, शहरीकरण, व्यापारीकरण, औद्योगिकीकरण या विविध कारणामुळे दुषित पाणी तसेच मुलमुत्र, गटारे यांचे पाणी या नदीत सोडले असल्याने ही गोडी नदी दिवसेंदिवस दुषित होत आहे. या प्रदुषणाचा फटका आता नागरिकांना नाहक सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. कावीळ, अतिसार, मलेरिया, डेंग्यू तसेच विविध जीवघेणे रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य कमी होत आहे. नुसती तहान नाही तर या नदीवर मोठया प्रमाणात मच्छिमारी ही केली जाते. अनेक खवय्ये खाऱ्या समुद्राच्या पाण्यातील मच्छी पेक्षा याच गोड्या पाण्यातील मच्छीला अधिक पसंदी देतात. ज्या प्रमाणें गोडे पाणी त्याच प्रमाणें मच्छीही गोडी असते. त्याच्या चवदार रसाचा अस्वाद घेणारे नागरिक या मच्छीला अधिक किंमत देतात. त्यामुळे या मच्छीमारामुळे ही नदी प्रदूषित होत आहे.
कुंभे येथून गोरेगाव पर्यंत ही नदी कुंभे, मांजरवणे, कांडेथर, साखल्याची वाडी, जिते, उंबर्डी, शिरवली, येलावडे, येरद, कडापे, कांदळगाव, कांदळगाव बुद्रुक, बोंडशेत, भाले, कोशींबळे, कडापेवाडी, चांदेवाडी, पाणस्पे, निजामपूर, कोस्ते बुद्रुक, मांडवकरवाडी, कोस्तेखुर्द, पाणोसे, साळवा, उतेखोल, भादाव, माणगाव, रिळे, पाचोळे, वावे, उणेगाव, कुंभार्ते, गांगवली गोरेगाव यासह कुंभे या स्वयंभू उगम स्थानाचे पश्चिमेकडील शेकडो महसुली गावे व त्या गावांच्या आदिवासी वाड्या, वस्त्यांची तहान भागवते. या नदीच्या पाण्यावर पाले व फळभाज्यांची पिके मोठया प्रमाणात शेतकरी घेतात. भात, कलिंगड, दुधीभोपळा, कारले, वांगी, भेंडी, मिरची, शिराली, घोसाळी, काळा भोपळा, शेवगा, काकडी, पालक, कोबी, मेथी, कोथिंबीर, मका, भुईमुग यासह अनेक पिके शेतकरी याच पाण्यावर प्रामुख्याने घेतात.
