• Thu. May 14th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अलिबागमध्ये रंगणार महापुरुषांच्या विचारांचा जागर; १७ मे रोजी जयंती महोत्सवाचे आयोजन

ByEditor

May 14, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचा पुढाकार; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा होणार गौरव

अलिबाग | सचिन पावशे
जगाच्या कल्याणासाठी क्रांतीकारी विचार मांडणाऱ्या महापुरुष आणि महामातांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, अलिबागच्या वतीने ‘जयंती महोत्सव २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रविवार, दिनांक १७ मे २०२६ रोजी अलिबाग येथील पी.एन.पी. नाट्यगृहात सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत पार पडणार आहे.

या महोत्सवाच्या रूपरेषेबाबत माहिती देण्यासाठी समितीने नुकतीच पत्रकार परिषद आयोजित केली होती. हा कार्यक्रम दोन सत्रांत विभागला असून, पहिल्या सत्रात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात नारायण गायकवाड गुरुजी (सामाजिक क्षेत्र), श्री. नितीन राऊत (अंधश्रद्धा निर्मूलन), ॲड. प्रसाद पाटील (शिक्षण क्षेत्र), श्री. सचिन कांबळे (कला व संस्कृती), श्री. गोपाळ कांबळे (पत्रकारिता क्षेत्र), डॉ. राजेंद्र चांदोरकर (वैद्यकीय क्षेत्र) आदी मान्यवरांना त्यांच्या योगदानाबद्दल गौरविण्यात येणार आहे.

सत्कार समारंभानंतर आयोजित विचार प्रबोधन सत्रात प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या उल्काताई महाजन, ‘कायद्याने वागा’ लोकचळवळीचे प्रणेते राज असारोंडकर आणि प्रा. डॉ. जयेश जाधव आपले विचार मांडणार आहेत. दुपारच्या दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध सिनेमा व नृत्य दिग्दर्शक सचिन कांबळे आणि त्यांचा संच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘संगीतमय नाट्य’ सादर करणार आहेत.

पत्रकार परिषदेला स्मारक समितीचे अध्यक्ष संजय जाधव, उपाध्यक्ष संतोष जाधव, सचिव उत्तम रसाळ, सहसचिव विजय गायकवाड, खजिनदार प्रदीप ओव्हाळ, तसेच अंजली गायकवाड, सविता ओव्हाळ, प्रफुल कानिटकर, मंगेश कानिटकर, नितीन गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, धरमदास डवले, पांडुरंग कदम, संतोष शिंदे, ॲड. विशाल जाधव, जयप्रकाश पवार, मिलिंद जाधव, प्रा. डॉ. पी. बी. आचार्य आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

अलिबाग परिसरातील नागरिकांनी या वैचारिक आणि सांस्कृतिक सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!