रोहा तालुक्यातील कातकरी समाजातील लेकीचे जागतिक यश; आदिवासी विकास विभागाच्या शिष्यवृत्तीचा लाभ
माणगाव | सलीम शेख
जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही जागतिक स्तरावर आपली मोहोर उमटवू शकतात, हे रोहा तालुक्यातील कोलाड-चिंचवली येथील कातकरी समाजातील विद्यार्थिनी सपना राजेश वाघमारे हिने सिद्ध केले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सपनाची उच्च शिक्षणासाठी युनायटेड किंगडममधील (UK) नामांकित विद्यापीठांमध्ये निवड झाली असून, तिच्या या यशाने रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
आदिवासी विकास विभागाच्या ‘ग्लोबल स्कॉलरशिप प्रोग्रॅम’ अंतर्गत सपनाची University of Leeds आणि Queen Mary University of London या जागतिक दर्जाच्या विद्यापीठांमध्ये निवड झाली आहे. अत्यंत दुर्गम भागातून येणाऱ्या सपनाने आर्थिक अडचणी आणि सामाजिक आव्हाने झेलत हे उत्तुंग यश संपादन केले आहे.
सपनाने आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव अंतर्गत असलेल्या मुलींच्या शासकीय वस्तीगृह, हडपसर (पुणे) येथे राहून आपले शिक्षण पूर्ण केले. तिचे आई-वडील मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकतात. अशा परिस्थितीत मुलीने सातासमुद्रापार शिक्षणासाठी घेतलेली झेप ही केवळ कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण आदिवासी समाजासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
सपनाच्या या यशात प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई, गृहपाल अर्चना पवार यांचे मार्गदर्शन तसेच ‘एकलव्य फाउंडेशन’चे शैक्षणिक सहकार्य मोलाचे ठरले आहे. सपना ही वनवासी कल्याण आश्रमशाळा, माणगावची माजी विद्यार्थिनी असून, तिच्या या यशाबद्दल कल्याण आश्रमाचे पदाधिकारी, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
जागतिक स्तरावर उच्च शिक्षण घेण्याचा निर्धार पूर्ण केल्यामुळे सपनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्या या यशामुळे ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांनाही मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळाली आहे.
