• Thu. May 14th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

इंधन बचतीसाठी म्हसळा तहसीलदारांची ‘सायकलवारी’; पंतप्रधानांच्या आवाहनाला दिला प्रतिसाद

ByEditor

May 14, 2026

म्हसळा | वैभव कळस
आखाती राष्ट्रांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधन टंचाईचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधनाचा वापर कमी करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला विधायक प्रतिसाद देत म्हसळा तालुक्याचे तहसीलदार सचिन खाडे यांनी आज स्वतः सायकलवरून कार्यालयात येत नागरिकांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

तहसीलदार सचिन खाडे आज १४ मे रोजी आपल्या शासकीय किंवा खाजगी वाहनाचा वापर न करता, निवासस्थानापासून ते तहसीलदार कार्यालयापर्यंतचे सुमारे १ किलोमीटरचे अंतर सायकलने पार करत कामावर हजर झाले. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि शहरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात येत आहे.

यावेळी संवाद साधताना तहसीलदार खाडे म्हणाले की, “पंतप्रधानांनी इंधन बचतीसाठी केलेल्या आवाहनाची सुरुवात मी स्वतःपासून केली आहे. सायकलच्या वापरामुळे केवळ इंधन बचत होत नाही, तर पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते आणि आपले शरीरही सुदृढ व तंदुरुस्त राहते. प्रत्येकाने जवळच्या प्रवासासाठी सायकलचा वापर केल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि वैयक्तिक आरोग्याला मोठा फायदा होईल.”

केवळ कार्यालयीन कामातच नव्हे, तर कौटुंबिक पातळीवरही खाडे कुटुंब इंधन बचतीचा वस्तुपाठ घालून देत आहे. “माझी आई आजही चुलीवर जेवण बनवून गॅसचा किमान वापर करते. यामुळे एका गॅस सिलिंडरचा वापर आम्ही तब्बल चार महिने करतो,” असे सांगत त्यांनी घरगुती इंधन बचतीचे महत्त्वही अधोरेखित केले.

प्रशासकीय प्रमुख असूनही कोणताही बडेजाव न मिरवता तहसीलदारांनी दाखवलेल्या या साधेपणामुळे आणि पर्यावरणप्रेमी भूमिकेमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!