समुद्रकिनाऱ्याचा सुविधापूर्ण विकास होणे गरजेचे
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनाऱ्याचे निसर्ग सौंदर्य पर्यटकांवर नेहमीच भुरळ घालत आहे. मात्र, हा किनारा अद्याप परिपूर्ण विकसित करण्यात आला नाही. या किनाऱ्यावर पर्यटनियदृष्टया आधुनिक सुविधांबरोबरच सुशोभीकरण करण्याची मागणी पर्यटक व स्थानिकांची होत आहे.
दिवेआगरला निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेला आहे. या सुवर्णभूमीला आता पर्यटनाबरोबर धार्मिक स्थळाचे वैभव प्राप्त झाले आहे. त्यामुळे येथील स्वच्छ व सुरक्षित समुद्रकिनारी नेहमीच मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. मात्र, किनाऱ्यावर बसून समुद्र न्याहाळण्यासाठी बैठका त्यासोबतच येथील अंधार दूर करून पथदिव्यांची रोषणाई अशा अनेक सुविधा पर्यटन वृद्धीगंत करण्यासाठी दुर्लक्षित आहेत.
श्रीवर्धनच्या धर्तीवर दिवेआगरला विकास होणे अपेक्षित आहे. कारण दिवेआगर समुद्रकिनारी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे काम गेली तीन वर्ष सुरू आहे. धुपप्रतिबंधक बंधारा ची रचना सुंदर आहे, मात्र, याच कामात दिरंगाई होत असल्याने, पुढे समुद्रकिनारा नेहमी स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक रहावा, सदैव पर्यटकांनी गजबजून जावा, यासाठी आवश्यक सुधारणा करण्यावर भर दिला जात नाही. दिवेआगरची चौपाटी चार किलोमीटर अंतरावर विस्तीर्ण झाली असून, येथे अत्याधुनिक पद्धतीने सुशोभीकरण करण्यात येऊन पर्यटन वाढीस चालना मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.
दिवेआगर किनारी धुप रोखण्यासाठी बंधारा बांधण्यात येत आहे. यामध्ये पुढे सुशोभीकरणासाठी बांधकाम होऊन पर्यटकांसाठी सुविधा मिळाव्यात अशी मागणी मंत्री महोदयांकडे करण्यात येत आहे.
-सिद्धेश कोजबे,
सरपंच दिवेआगर.
