उरण पोलिसांची तातडीने कारवाई; आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निष्पन्न
उरण | अनंत नारंगीकर
उरणचे भाजप आमदार महेश बालदी यांच्या निवासस्थानाजवळ शुक्रवारी (दि. १३) रात्रीच्या सुमारास हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाला उरण पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे. विशाल जयसिंग पवार (वय २५) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्या या कृत्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, तो दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
शुक्रवारी रात्री उरण शहरातील ठाकूरनगर परिसरात एक तरुण हातात धारदार कोयता नाचवत फिरत होता. हा तरुण फिरत फिरत थेट आमदार महेश बालदी यांच्या निवासस्थानाजवळ पोहोचला. रात्रीच्या अंधारात हातात शस्त्र घेतलेल्या या इसमामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांची मोठी धावपळ उडाली आणि परिसरात खळबळ माजली.
घटनेची माहिती मिळताच उरण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि संशयित विशाल पवार याला शस्त्रासह ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी विशाल पवार (रा. साई दर्शन अपार्टमेंट, ठाकूरनगर, कामठा, उरण) हा दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला आहे. शुक्रवारी रात्री देखील तो पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याच नशेत त्याने परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही राजकीय हेतूने नव्हे, तर केवळ व्यसनाधीनतेतून त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या तपासात प्राथमिक दृष्ट्या दिसून आले आहे.
या प्रकरणी फिर्यादी मिलिंद गणपत कारंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक पुढील तपास करत आहे. आमदारांच्या घराबाहेर घडलेल्या या प्रकारामुळे उरणमध्ये सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
