महाड | मिलिंद माने
महाड शहर आणि नडगाव परिसरात रविवारी आगीच्या दोन भीषण घटना घडल्या. यामध्ये एका डायग्नोसिस सेंटरसह भंगार गोदामाला आग लागून मालकांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शहरातील डायग्नोसिस लॅब भस्मसात
पहिली घटना महाड शहरातील रोहिदास नगर परिसरात घडली. येथील प्रगती विराज दळवी यांच्या मालकीच्या ‘आयकॉन डायग्नोसिस लॅब’ला रविवारी मध्यरात्री भीषण आग लागली. आगीची चाहूल लागताच स्थानिक रहिवाशांनी तातडीने धाव घेत लॅबचा दरवाजा तोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते.
या आगीत लॅबमधील अत्याधुनिक एक्स-रे मशिनरी, कॉम्प्युटर, फर्निचर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून खाक झाली आहेत. या दुर्घटनेत सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज विराज दळवी यांनी व्यक्त केला आहे.
नडगावमध्ये भंगार गोदामाला आग
दुसरी घटना रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास नडगाव गावाजवळ घडली. येथील कलाम यांच्या मालकीच्या भंगार गोदामाला अचानक आग लागली. या आगीची तीव्रता इतकी होती की, शेजारील शाम सुरेश गुडेकर यांच्या पॅलेट बनवणाऱ्या लघुउद्योगालाही तिची झळ बसली. गुडेकर यांच्याकडील लाकडी भुसा जळून खाक झाल्याने त्यांचे सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. भंगार गोदामातील मालाचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले असून आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
अग्निशमन दलाची तत्परता
दोन्ही घटनांची माहिती मिळताच महाड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली, ज्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. सध्या दोन्ही ठिकाणी पंचनाम्याचे काम सुरू आहे.
