पेण । प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून पेण येथील ‘गॅलेक्सी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत हॉस्पिटलच्या प्रांगणात पार पडणार आहे.
या शिबिराचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ आणि ‘आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ अंतर्गत पिवळे, केशरी तसेच पांढरे रेशन कार्ड असणाऱ्या सर्व कुटुंबांना पूर्णपणे गुणवत्तापूर्ण आणि मोफत आरोग्य सेवा दिली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने रक्तातील साखरेचे प्रमाण (Random Sugar), संपूर्ण रक्त गणना (CBC), ई.सी.जी. (ECG) यांसारख्या तपासण्या, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि आवश्यक औषधे पूर्णपणे मोफत पुरवण्यात येणार आहेत.
प्रसिद्ध फिजिशियन व मधुमेह तज्ज्ञ डॉ. नयन ब्रम्हे (MBBS, MD) यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या शिबिरात मधुमेह, थायरॉईड, हृदयाचे विकार, दमा, साथीचे आजार, पॅरालीसीस, मूत्र विकार आणि सांधेवात यांसारख्या विविध आजारांवर तपासणी व उपचार केले जातील. याशिवाय, जनरल सर्जरी, हाडांच्या शस्त्रक्रिया, कान-नाक-घसा (ENT), मुतखडा व मूत्रपिंड शस्त्रक्रिया, मणक्याची शस्त्रक्रिया तसेच पित्ताशय व पचनसंस्थेच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया शासकीय योजनेतून मोफत केल्या जातील.
हे शिबीर गॅलेक्सी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, दर्शन बिझनेस पार्क १, जुन्या पेट्रोल पंपाजवळ, पेण येथे होणार असून अधिक माहितीसाठी ८८५०० ६०३४७ किंवा ९२०९३ ७८८०७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पेण व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
