उरण | घन:श्याम कडू
महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त घारापुरी (एलिफंटा) बेटावर मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुरळीत व्हावा यासाठी जलवाहतूक, सुरक्षा व आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
घारापुरी बेटावर जाण्यासाठी मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया, मोरा (उरण), जेएनपीटी (लॅन्डिंग जेटी) तसेच न्हावा येथून जलवाहतूक सुविधा उपलब्ध राहणार आहे. मोरा ते घारापुरी एकेरी तिकीट दर रुपये ६५/- असा बंदर विभागाने निश्चित केला आहे. जेएनपीटी येथून सकाळी ७.०० वाजता पहिली बोट सुटणार असून एलिफंटा येथून जेएनपीटीसाठी शेवटची बोट दुपारी ३.३० वाजता असेल.
भाविकांनी बोटीत चढताना व उतरताना काळजी घ्यावी, अधिकृत तिकीट घेतल्याशिवाय प्रवास करू नये तसेच शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जादा भाडे आकारल्यास तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मंदिर परिसरात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, लहान मुलांना गर्दीत एकटे सोडू नये तसेच शिवमंदिर (लेण्यांमध्ये) धूम्रपान व मद्यपानास सक्त मनाई आहे.
भाविकांच्या मदतीसाठी नागरी संरक्षण दल, पोलीस दल, आरोग्य विभाग तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तैनात करण्यात आले आहेत. कोणतीही अडचण भासल्यास खालील संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रशासनाने कळविले आहे.
📞 ग्रामपंचायत घारापुरी – ९८९२८५७०७४
📞 तहसील कार्यालय – ०२२-२७२२२२३
📞 एलिफंटा बंदर अधिकारी – ८९९९२९९३२५
📞 मोरा मच्छीमार सहकारी सोसायटी – ९८६७२९१६०
📞 मोरा बंदर अधिकारी – ९८१९७४६१०४
📞 सागरी पोलीस ठाणे मोरा – ८३६९९६२५१३
महाशिवरात्रीच्या निमित्ताने येणाऱ्या सर्व भाविकांचे प्रशासनाकडून स्वागत करण्यात येत असून सुरक्षित, शिस्तबद्ध आणि शांततेत दर्शन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
