• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सुडकोलीमधील आमसभेत सचिवपदावरून चाकू हल्ला

ByEditor

Jan 2, 2024

तुंबळ हाणामारीत ६ जण जखमी; दोन्ही गटाच्या १८ जणांविरोधात गुन्हा दाखल

शशिकांत मोरे
धाटाव :
रोहा तालुक्यातील चणेरा विभागातील सूडकोली गावात मुस्लिम समाजाच्या (गावकी) नवीन कार्यकारणी मंडळाच्या निवडीसाठी जामा मशीदीत आमसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सदर जमातीच्या सचिव पदाच्या मुद्द्यावरून गांवातील दोन गटात सभेतच बाचाबाची आणि शिवीगाळ सुरू होऊन त्याचे पर्यावसान तुंबळ हाणामारीत झाले. चाकूने हल्ला करून एकमेकांना बेदम मारहाण करण्यात आली. तर कोणीही कुणाचे ऐकायला तयार नसल्याने जीवेठार मारण्याची धमकी देण्याची घटनाही घडली. या हाणामारीत ६ जण जखमी झाले असून रोहा पोलीस ठाण्यात १८ जणांविरोधी परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.

रोहा तालुक्यातील चणेरा विभागातील सूडकोली गावातील जामा मशीदीत ३१ डिसेंबर रोजी १० वा. मुस्लिम समाजाच्या जमातीच्यावतीने नवीन कार्यकारणी मंडळ निवडी करिता आमसभेचे आयोजन केले होते. या आमसभेत सचिवपदाची निवड होत असताना फिर्यादी अक्रम असलम मेमन (२४) याने शांत बसा असे बोलले असता आरोपी अब्दुल रहेमान भुरे याने तुला दाखवतो, शांत कसा बसायचे असे बोलून शिवीगाळ केल्याने बाचाबाची होऊन आरोपी अब्दुल रहेमान भुरे हे अक्रम मेमन यांच्या अंगावर धावत येऊन हाथाबुक्क्यानी मारहाण केली. त्यानंतर आरोपी अब्दुल रहेमान भुरे यांच्यासह सादिक अब्दुल रहेमान भुरे, साजिद अब्दुल रहेमान भुरे व साहिद अब्दुल रहेमान भुरे यांनी त्याला पकडून ठेवले तर सादिक भुरे याने त्यांच्या खांद्यावर, पाठीवर अक्षरशः चाकूने वार केले. या हाणामारी दरम्यान समीर छोटू शेख हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्याच्या बोटावर वार केले. त्यानंतर फैरोज शकुर घारे याला अब्दुल रहेमान भुरे, शाहनवाज मजीद भुरे, साद सर्फराज भुरे, सलमान हनिफ भुरे, जावेद युनूस भुरे (सर्व रा. सूडकोली) या सर्वांनी संगनमत करून अक्रम अस्लम मेमन, समीर छोटू शेख, फैरोज शकूर घारे यांना मारहाण केली. या मारहाणीत एका गटातील ३ जण जखमी झाले आहेत.

तर दुसऱ्या गटातील फैयाज घारे, फैरोज घारे, अजर मेमन, अक्रम मेमन, सिंकदर मेमन, अजीज मेमन, नविद भुरे, समीर शेख, मौसिन मेमन यांनी संगनमत करून फिर्यादी जावेद युनूस भुरे व सादिक अली अब्दुल रहेमान भुरे, साजिद अब्दुल रहेमान भुरे यांना शिवीगाळ करून अंगावर धावून जाऊन तू बाहेर भेट तुला जीवातून ठार मारतो अशी धमकी देत हाथाबुक्क्याने मारहाण केली.

या घटनेतील जखमींना उपचारासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनुक्रमे गुन्हा रजी. १/२०२४ भा. द.वि.का. क. ३२४,३२३,१४३,१४४,१४७,१४९, व ५०४ तर गुन्हा रजी. २/२०२४ भा. द.वि.का.क. ३२३,५०४,५०६,१४३,१४९ या कलमांन्वये परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह. शिद यांच्यासह सहकारी वर्ग अधिक तपास करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!