श्रीवर्धनचे डायलिसिस सेंटर आरओ प्लँटमुळे रखडले
गंभीर आजाराच्या रुग्णांची उपचारासाठी होतंय परवड
गणेश प्रभाळे
दिघी : जिल्ह्यातील मुत्रपिंड विकाराच्या रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असलेल्या डायलिसिस सुविधेसाठी रायगड मधील श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा झाली. मात्र ते अद्यापही सुरू न झाल्याने डायलिसिस रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात उपजिल्हा रुग्णालय पेण, रोहा, श्रीवर्धन आणि कर्जत येथे प्रत्येकी एक केंद्र आणि त्याठिकाणी प्रत्येकी दोन डायलसिस मशिन व आरओ प्लँट बसविण्यात येणार होते. मात्र माणगाव व पेण येथे केंद्र सुरू झाली. पण श्रीवर्धनला डायलिसिस मशीन येऊन सहा महिने झाले आहेत. अद्याप सुविधा मिळत नसल्याने तालुक्यातील रुग्णांना रुग्णालयात जाण्यासाठी प्रवासाची दगदग आणि अधिकची पदरमोड करावी लागत असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत असून उपचाराविना जीव धोक्यात आला आहे.
मूत्रपिंडाच्या आजाराची श्रीवर्धन व म्हसळ्यात रुग्ण आहेत. मात्र सोय नसल्याने खाजगी रुग्णालयात डायलिसिस करावे लागत आहे. मात्र, खाजगी केंद्रात त्याची फी ही पंधराशे आहे त्यामुळे सामान्य रुग्णांना आठवड्यातून तीनदा डायलिसिस करणे परवडत नाही. डायलिसिस हे मोफत मिळाले तर अनेक गरीब रुग्णांना त्याचा जगण्यासाठी फायदा होईल असे मत रुग्णांकडून व्यक्त करण्यात आले.
गंभीर आजारात वाट किती पाहणार?
माणगाव उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिससाठी कित्येक रुग्ण अगोदरच प्रतीक्षा यादीत आहेत. त्यामुळे इतर रुग्णांना आपला नंबर कधी येईल याची वाट पहावी लागते किंवा खाजगी सेंटर ला जावे लागते.
काय आहे डायलिसिस?
किडनी वाचविण्याचे सर्व उपचार झाल्यानंतर जेव्हा ती कार्य करणे थांबते तेव्हा किडनी निकामी होते. अशावेळी शरीरातील रक्त शुद्धीकरणाचे कार्य थांबते आणि ते कृत्रिमरित्या करणे आवश्यक असते. किडनीचे कार्य कृत्रिमरीत्या करणे म्हणजेच डायलिसिस होय, त्यावेळी किडनीविकारतज्ञ्च्या मदतीने डायलिसिस हा पर्याय रुग्णासाठी उरतो. डायलेसिस मशीनचा आधार घेऊन रक्तातील अशुद्ध घटक बाहेर फेकून शुद्ध रक्त शरीरात पुरविले जाते.
कित्येक वेळा माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे डायलिसिस करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, दरवेळी वेटिंग आहे असं सांगण्यात येते. प्रत्येक वेळी खाजगी सुविधा घेणे अश्यक्य आहे. श्रीवर्धन मध्ये डायलिसिस सेंटर लवकरच व्हायला हवे.
-राकेश प्रभाळे,
रुग्ण श्रीवर्धन.
आरओ प्लांटमुळे अपुरी सुविधा डायलिसिस लागणारे आरओ प्लांट सीएसआर निधीतून होण्याचे प्रस्तावित आहे. मंत्री अदिती तटकरे यांच्यामार्फत अधिकचा पाठपुरावा सुरू आहे व त्यासाठी लागणारे पत्रव्यवहार आम्ही रूग्णालयाकडून करत आहोत, असे श्रीवर्धन रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ गोरे यांनी सांगितले. |