सह्याद्री महिला ग्रामसंघाचे मोलाचे योगदान
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील श्री. मोहनलाल सोनी विद्यालयात रविवारी महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. बोर्लीपंचतनचे रहिवासी डॉ. राजेश पाचारकर आणि सह्याद्री महिला ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या मोफत आरोग्य शिबिरामध्ये ५५० रुग्णांनी लाभ घेतला आहे.
या शिबिराला पूणे, मुंबई, माणगाव, अलिबाग येथील डॉक्टरांनी तज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा देऊन रुग्णांच्या विविध आजारांची तपासणी करुन त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन व मोफत औषधांचं वाटप केले. त्याचबरोबर सुरुवातीला मधुमेह, रक्तदाब, ईसीजी तपासणीही करण्यात आली. बोर्लीपंचतन पंचक्रोशीतील रुग्णांबरोबरच श्रीवर्धन, म्हसळा येथील रुग्णांसह एकूण ५५० रुग्णांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
याप्रसंगी संवाद साधताना डॉ.राजेश पाचारकर यांनी सांगितलं की आज आपल्या विभागात लोकांना तज्ञ डॉक्टरांची सेवा मिळत नसल्याने विविध आजारांवरील तज्ञ डॉक्टर आपल्या गावामध्ये आणून त्यांच्याकडून मोफत सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे. आपल्या आरोग्याच्या बाबतीत आपण गंभीरपणे विचार करा. आपल्याकडे येणाऱ्या तज्ञ डॉक्टरांचं मिळणारं मोफत मार्गदर्शन आपण घ्यावे आणि आपलं आरोग्य जपावं. या शिबिराला लाभलेल्या एवढ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भविष्यात असेच विविध उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे सांगितले.