• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

लाचखोरीच्या प्रकरणात दोन सहाय्यक अभियंते जेरबंद; एक अलिबाग तर दुसरा उरण पंचायत समिती मधील

ByEditor

Feb 23, 2024

घन:श्याम कडू
उरण :
रायगड जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. लाचखोरीच्या प्रकरणात दोन सहाय्यक अभियंत्यांना नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले आहे. उरण पंचायत समितीमधील रेश्मा ओमकार नाईक, आणि सतीश वसंत कांबळे अशी आरोपींची नावे आहेत. उरण मधील हा छोटासा मासा अडकला असून इतर अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांचा घोटाळा बाहेर येणार असल्याची उरणमध्ये चर्चा सुरू आहे.

गावातील विकासकामांचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी उरण येथील पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता रेश्मा नाईक यांनी ३० हजार रुपयाांची लाच मागितली होती. याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ८ फेब्रुवारीला लाचप्रकरणाची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत रेश्मा नाईक यांनी स्वतःसाठी तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता सतीश कांबळे यांच्यासाठी ३० हजारांची लाच मागीतली, तडजोडीनंतर २५ हजार रुपये स्वीकारण्याचे कबुल केले.

त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २१ फेब्रुवारी रोजी सापळा लावला होता. मात्र रेश्मा नाईक यांनी लाचेची रक्कम रायगड जिल्हा परिषदेत अलिबाग येथे सहाय्यक अभियंता सतीश कांबळे यांच्याकडे देण्यास सांगितली. सतीश कांबळे यांनी २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजून ५५ मिनटांनी ही लाचेची रक्कम स्विकारली. लाचलुचपत प्रतिबंधक नवीमुंबईच्या विभागाने त्यांना लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले.

या प्रकरणी दोन्ही सहाय्यक अभियंत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणामुळे जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. यापूर्वी अनेक तक्रारदारांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागून ही उरण पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आर्थिक साटेलोटामुळे हा भ्रष्टाचार दडपून ठेवला होता. अखेर लाचलुचपत खात्याने तो उघड केला आहे. यामध्ये उरण मधील रेश्मा भोईर यांच्यावर कारवाई झाली असली तरी पंचायत समितीमधील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचे ग्रामसेवक, सरपंच सांगतात. कोणत्याही कामांची मंजुरी ही त्या घटनास्थळी स्वतः न जाता कार्यालयात बसूनच अनधिकृत ठेकेदारांकडून कामे करून करोडोची माया रेश्मा भोईरने गोळा केली असल्याची चर्चा सुरू आहे.

तसेच यामध्ये रेश्मा भोईर यांना पाठबळ देणारे उरण पंचायत समितीमधील वरिष्ठ अधिकारी तसेच बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी यांचा भ्रष्टाचारामध्ये सहभाग असल्याचे ग्रामसेवक व सदस्य सांगतात. त्यामुळे उरण मधील वरिष्ठ अधिकारी व बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्या कारभाराची व मालमत्तेची चौकशी केली तर नक्कीच महाभयंकर घोटाळा उघड झाल्याशिवाय राहणार नाही. उरण पंचायत समितीमध्ये कोणतेही काम हे पैसे दिल्याशिवाय होतच नाही. तसेच करोडोचा भ्रष्टाचार करणारा ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांना शाही थाटाची वागणूक मिळते कारण त्यांच्याकडून लाखों रुपयांचा मलिंदा अधिकारी वर्गाना मिळत असल्याचे समजते. काल कारवाई होताच आज एकही वरिष्ठ अधिकारी पंचायत समिती कार्यालयात फिरकले नाहीत. यावरून त्यांचेही धाबे दणाणले असल्याचे दिसते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!